लाल केळी लागवडीसाठी टिश्‍यू कल्चर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान विभागाने लाल केळीच्या लागवडीसाठी उती संवर्धन तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळविले आहे. 

दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान विभागाने लाल केळीच्या लागवडीसाठी उती संवर्धन तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळविले आहे. 

रायगड जिल्हा परिषदेच्या मागणीनुसार हा प्रकल्प राबविला असून रायगड जिल्ह्यातील मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, दिवेआगर, अलिबाग या भागात लाल केळीची (स्थानिक नाव तांबेळी) प्रामुख्याने लागवड केली जाते. आकर्षक लाल रंगाची केळी अधिक पैसे मिळवून देणारी असल्याने नारळ आणि सुपारी बागांमध्ये आंतरपिक म्हणून लाल केळीच्या लागवडीस शेतकरी प्राधान्य देतात. ही जात उंच वाढणारी असून घडात 5 ते 6 फणे असतात. प्रत्येक फण्यात 12 ते 14 केळी असतात.

ही केळी स्वादिष्ट असून त्यांच्या आगळयावेगळया रंगामुळे त्यांना 120 ते 140 रुपये डझन दर मिळतो. मात्र या जातीच्या संवर्धनासाठी फारसे प्रयत्न झाले नव्हते. शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेने दापोली येथील विद्यापीठाच्या संशोधन संचालकांच्या माध्यमातून वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्र येथे संपर्क साधला.

या केंद्राने प्रकल्प तयार करून तो मंजूर करून घेतला. आता पंधरा महिन्यांच्या अथक प्रयत्नाने लाल केळीची उती संवर्धित रोपे तयार केली असून या रोपांची प्राथमिक चाचणी उद्यानविद्या विभागाच्या दापोली प्रक्षेत्रात घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतावर चाचणी घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना उती संवर्धित रोपे लवकरच वितरित करण्यात येणार आहेत. 

मागणीनुसार रोपे 
प्रकल्प वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्रभारी डॉ. संतोष सावर्डेकर आणि डॉ. नितीन गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला होता. विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर आणि विद्यमान संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांच्या प्रेरणेने हा प्रकल्प राबविला. विद्यापीठाच्या संशोधकांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लाल केळीची उती संवर्धित रोपे तयार करण्यासाठी शास्त्रोक्‍त पध्दत विकसित केल्याबद्‌दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्‌टाचार्य यांनी समाधान व्यक्‍त केले आहे.