सध्याच्या शिक्षण खात्याचाच विनोद - उदय सामंत

सध्याच्या शिक्षण खात्याचाच विनोद - उदय सामंत

रत्नागिरी - सध्या शिक्षण खात्याचाच विनोद झाला आहे. मला एका दिवसासाठी शिक्षणमंत्री केले तर शिक्षकांचे सगळे प्रश्न सोडवेन. परंतु चांगले काम करणाऱ्यांना मंत्रीपद दिले जात नाही, असे प्रतिपादन आमदार उदय सामंत यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेच्या अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार सामंत बोलत होते.

आॅनलाईन कामासाठी केद्रस्तरावर ५० डेटा एन्ट्री आॅपरेटरची नेमणूक आणि दुर्गम भागातील शाळा बंद करण्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करणार तसेच हे दोन प्रश्न लवकरच मार्गी लावणार

- उदय सामंत, आमदार

यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती दिपक नागले, पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे, उपसभापती सुनिल नावले, अध्यक्ष चंद्रकांत पावसकर, माजी जिल्हाध्यक्ष मनोजे रेडिज, कार्याध्यक्ष अशोक भालेकर, सरचिटणीस उदय शिंदे, कार्यालयीन चिटणीस संतोष पेवेकर, कोषाध्यक्ष दीपक माळी सदस्य संजय डांगे, विनायक हातखंबकर, नरेश सावंत आदी उपस्थित होते. 

शिक्षक मुलांसाठी योगदान देत असतात. परंतु शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव सादर करावे लागतात. हे योग्य नाही. विनाप्रस्ताव शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करणार असून विनाप्रस्ताव आदर्श शिक्षक पुरस्कार देणारा रत्नागिरी जिल्हा पहिला ठरेल, असे आमदार सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात गुणवत्ता आहे. हे सलग सहा वर्षे दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशातून दिसते आहे. याचे श्रेय शिक्षकांना जाते. आपल्याकडील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे, परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी मागे  पडतात. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणारे विद्यार्थी आपण घडविले पाहिजे

- दिपक नागले

शिक्षकांचे प्रस्ताव घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. परंतु शिक्षक चांगले काम करतात याची माहिती ग्रामस्थ, केंद्रप्रमुखांकडून घेऊन पुरस्कार दिले पाहिजे यासाठी शिक्षण सभापती म्हणून प्रयत्न करणार असल्याचे श्री. नागले यांनी सांगितले.

पुरस्काराच्या फाईलमध्ये शिक्षकांचे चांगले काम दिसते परंतु त्या कामात सातत्य दिसत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पोषण आहार आणि सुगम-दुर्गम भागातील शाळांची यादी हे दोन विषय सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री.नागले यांनी सांगितले. 

सरकारचा जि. प. शाळाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न आहे का अशी भीती आम्हा शिक्षकांना वाटत आहे. २०१६-१७ या वर्षात १२०० आदेश काढण्यात आले तर ५५० शासन निर्णय काढले गेले आहेत.  परंतु शासन निर्णय काढत असताना शिक्षकांची मानसिकता पाहणे आवश्यक आहे. आज शिक्षक दडपणाखाली काम करीत आहे. आॅनलाईनमुळे पगार वेळेवर मिळत नाही त्यामुळे शिक्षक आर्थिक अडचणीत सापडला आहे, असे मनोज रेडीज यांनी सांगितले. 

१९९० मध्ये रत्नागिरी जिल्हा डोंगरी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. परंतु आरटीईनुसार या निर्णयात बदल करण्यात आला आहे. शासनाने पुन्हा डोंगरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरीचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करावा.

- मनोज रेडीज  

यावेळी मानसी गवंडे, दिपक माळी, मंगेश भोसले, डाॅ. सुप्रिया खंडकर, डाॅ. अस्मिता मजगांवकर, रघुनाथ गोरे, राजेशकुमार गुरव, संजय डांगे, सुधीर जाधव, दिगंबर तेंडुलकर, प्रकाश पवार, दिलीप देवळेकर या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com