कायदेपंडितांमुळे विकासात अडथळे - वैभव खेडेकर

कायदेपंडितांमुळे विकासात अडथळे - वैभव खेडेकर

खेड - शिवसेनेच्या काही बिलंदर कायदेपंडित नगरसेवकांमुळे शहराच्या विकासकामात अडथळा येत आहे, असा आरोप करीत या पंडितांना धडा शिकवण्याला मला फार वेळ लागणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिला.

चांगल्या निर्णयांना बहुमताच्या जोरावर सेना नगरसेवक सतत विरोध करतात. लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या कारकिर्दीत जनहिताची कामे होऊ नयेत, हाच अजेंडा सेना नगरसेवकांचा आहे. त्यामुळे अनेक कामांचा निधी पडून आहे. अखर्चित निधी शासनाच्या कर्जमाफीसाठी वळवावा, असे शासनाचे परिपत्रक आले आहे. हा निधी वेळेत खर्च न झाल्यास तो शासनाकडे जाईल. या सगळ्याला सेना नगरसेवक जबाबदार असतील, असा आरोप त्यांनी केला. शहराचा विकास व्हावा, सुधारणा झटपट व्हाव्यात, नागरिकांचे राहणीमान उंचवावे, यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो; पण सेनेच्या बहुमतामुळे

नगराध्यक्षांच्या कामावर मर्यादा येतात. पालिकेतील सेनेच्या काही कायदेपंडित नगरसेवकांमुळे त्यांच्यातच अंतर्गत धुसफूस, रोष आहे. याचा कधीही उद्रेक होऊ शकतो. तसे झाल्यास उद्रेकाचे नेतृत्व वैभव खेडेकरच करेल, असा इशारा त्यांनी दिला.
शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये धुसफूस आहे. तसेच कायद्याचा आधार घेत किंवा प्रक्रियांचा अडथळा निर्माण करून कामे थांबविली जातात, असा आरोप शिवसेनाअंतर्गत नगरसेवकच करीत आहेत, अशी चर्चा खेड शहरात रंगली होती. त्या वेळी या पद्धतीला कंटाळल्यामुळे नगरसेवक राजीनामा देण्याच्या मनस्थितीत होते, अशा तऱ्हेची चर्चा होती. मात्र, कालांतराने या साऱ्यावर पडदा पडला. आता साक्षात नगराध्यक्षांनीच शिवसेनेच्या नगरसेवकांवर आरोप केल्यामुळे याआधी झालेल्या चर्चेला एकप्रकारे पुष्टी मिळाली आहे.

दोन खेडेकरांमध्ये आरोप-प्रत्यारोप
नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या आरोपांना सेना गटनेते बाळाराम खेडेकर यांनी रोखठोक उत्तर दिले. हे आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी याआधी जाहीरपणे सांगितले; परंतु वैभव खेडेकर यांनी केलेल्या आरोपांत किती सत्य आहे हे दाखविण्यासाठी सोशल मीडिया सक्रिय झाला आहे. त्यातून दोन खेडेकरांमध्ये धुमसत असलेल्या वादाला तोंड फुटले आहे. त्याचा परिणाम शहराच्या विकासकामांवर दिसून येईल. त्यामुळे शहराच्या विकासात तरी सेना-मनसे-राष्ट्रवादीने राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत शहरवासीयांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com