कोकणातून हवे तेजस, व्हिस्टाडोमचे स्वागत...

कोकणातून हवे तेजस, व्हिस्टाडोमचे स्वागत...

चिपळूण -  सहा महिन्यांत भारतीय रेल्वेत दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. देशातील अत्याधुनिक बनावटीची ‘तेजस’ गाडी आणि ‘व्हिस्टाडोम’ कोचची गाडी. या गाड्या तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कृपेने कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात आल्या. येथील जनतेने तर नाहीच; पण कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तेजस किंवा व्हिस्टाडोम कोच कोकण मार्गावर पळवावा, अशी मागणी केली नव्हती. तरीही भारतीय रेल्वेने या दोन्ही गाड्या कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला. डबलडेकर, तेजसनंतर व्हिस्टाडोमसारख्या विशेष गाड्यांचे कोकणवासीयांनी स्वागत करायला हवे. 

कोकण पर्यटनाचे भक्कम केंद्र होईल 
कोणीही मागणी केलेली नसताना भारतीय रेल्वे मंत्रालयाने अत्याधुनिक ‘तेजस’ आणि ‘व्हिस्टाडोम’ कोकण रेल्वे मार्गावर चालविल्यामुळे भविष्यात कोकण आणि गोव्यात पर्यटकांची संख्या वाढणार आहे. कोकण रेल्वेचे दुपरीकरण, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, समुद्रसफारीसारखे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर कोकण केवळ महाराष्ट्रात नव्हे; तर देश पातळीवर पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनण्यास साह्य होईल.

तीन वर्षांपूर्वी झाली होती घोषणा
तीन वर्षांपूर्वी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रसाद तायल यांनी या कोचची घोषणा केली होती. प्रथम एक कोच येईल, त्यानंतर या कोचमध्ये वाढ होत जाईल, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार हा कोच सप्टेंबर महिन्यात मुंबईत दाखल झाला. भविष्यात मुंबई-नाशिक  आणि लोणावळा-खंडाळा मार्गावर असाच कोच चालविला जाणार आहे.

स्वागताऐवजी त्रुटी काढण्यावर भर
’अतिथी देवो भव’ असे मानून येणाऱ्या पर्यटकांना आपल्या कोकणच्या निसर्गसौंदर्याचा आनंद कसा लुटता येईल याबाबत रेल्वेला सूचना करण्याऐवजी नवीन गाड्यांबाबत त्रुटी काढल्या जात आहेत. कोकणात नवीन गाडी आली म्हणजे ती आमच्या स्थानकावर थांबली पाहिजे. रेल्वेचे तिकीट कमी झाले पाहिजे. अशा मागण्या सुरू झाल्या. शिवाय आंदोलनाच्या भाषा आहेतच. गाडी थांबणे आणि पुन्हा सुरू करणे यामध्ये लागणारे वाढीव इंधन आणि वेळ याचा विचार करून गाड्या चालवायला लागतात. एसटीप्रमाणे टप्प्याटप्प्याला रेल्वेला थांबे दिले तर जलद गाड्या याला अर्थच राहणार नाही. तेव्हा याबाबत पुढाऱ्यांनीही विचार करून आंदोलनाची हाळी दिली पाहिजे.

तिकीट दरावरून वाद 
मुंबई-गोवा मार्गावरील वेगवान जनशताब्दी एक्‍स्प्रेस रेल्वेला व्हिस्टाडोम जोडण्यात आला; पण गाडीला जोडण्यापूर्वीच तिकीट दरावरून वाद सुरू झाला. स्पाईसजेट, गो एअर, इंडिगो या विमानाच्या तिकिटांचे दर दाखवून या रेल्वेची तुलना विमानाच्या तिकीटाबरोबर झाली. तेजस आणि डबल डेकरच्या तिकीटाबाबतही अशीच ओरड झाली. विमानसेवा जिथे समांतर सेवा म्हणून सुरू आहे तेथे ही तुलना प्रवासी करतील. मात्र, विमानाची सुविधा नसलेल्या प्रवाशांना या तुलना करण्यात रस नाही. 

व्हिस्टाडोम पर्यटकांसाठी

व्हिस्टाडोम कोच हा नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मुळीच नाही. तो देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आहे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना कोकणात ठासून भरलेल्या निसर्गसौंदर्याचे दर्शन व्हावे यासाठीच या ’व्हिस्टाडोम’ची निर्मिती झाली आहे. एखाद्या नियमित प्रवाशाला प्रवास करावयाचा असेल तर ना नाही. त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागले अशी कुरकुर करण्यात अर्थ नाही. 

२० वर्षानंतरही ४० टक्के अधिभार

कोकण रेल्वे सुरू होऊन २० वर्षे झाली; पण ४० टक्के जादा अधिभार (१०० कि. मी. मागे ४० कि. मी.चे जादा भाडे) प्रवाशांकडून वसूल केले जाते. त्याबाबत कोणीच बोलत नाही किंवा पाठपुरावा करीत नाही. हा अधिभार रद्द झाला तर तिकीट दरात आणखी कपात होऊन तेजस, व्हिस्टाडोमसह एक्‍स्प्रेस गाड्यांच्या तिकीट दरात आणखी कपात होईल. कोकण रेल्वेकडून होणारा हा अन्याय दूर होणे गरजेचे आहे.

व्हिस्टाडोम कोच’ची एक स्वतंत्र गाडी हवी, जी सकाळी दादरवरून सुटेल आणि सूर्यास्त होण्यापूर्वी गोव्यात पोहोचेल. तरच कोकणच्या दऱ्याखोऱ्यांचा, नदीनाल्यांचा, पोफळी, नारळांच्या, उंच उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेता येईल. म्हणूनच हा ‘व्हिस्टाडोम’ कोच २०२५१/५२ जनशताब्दीऐवजी १०१०३/०४ मांडवी एक्स्प्रेसला जोडायला हवा. कारण जनशताब्दी आणि तेजस जाताना जरी दिवसाढवळ्या पोहोचत असली तरी येताना तिचा प्रवास काळोखातूनच होतो. त्यामुळे येताना प्रवाशांना कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येणार नाही.
- शौकत मुकादम, अध्यक्ष, कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती

भारतीय रेल्वेच्या चांगल्या उपक्रमांना आम्ही नेहमीच साथ दिली आहे. पर्यटनाला वेगाने चालना मिळणारच. तेजस, व्हिस्टाडोम ही सुरुवात आहे. भविष्यात कोकणात पर्यटक मोठ्या संख्येने येतील. म्हणूनच पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना आरामदायी प्रवासासाठी भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला असावा.
- विनायक राऊत,
खासदार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com