एसटीसाठी ग्रामस्थांचे श्रमदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

मंडणगड - तालुक्‍यातील गोठे खलाटी येथे कायमस्वरूपी एसटी येण्यासाठी येथील साठ कुटुंबांची धडपड अजूनही सुरूच आहे. चांगल्या रस्त्याअभावी पावसाळ्यात चार महिने गाडी बंद करण्यात येते. त्यामुळे येथील नागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय होते.

मंडणगड - तालुक्‍यातील गोठे खलाटी येथे कायमस्वरूपी एसटी येण्यासाठी येथील साठ कुटुंबांची धडपड अजूनही सुरूच आहे. चांगल्या रस्त्याअभावी पावसाळ्यात चार महिने गाडी बंद करण्यात येते. त्यामुळे येथील नागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय होते. पुन्हा एसटी सुरू करण्यासाठी ग्रामस्थ व महिला श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम वर्षानुवर्षे करीत आहेत. पण शासन व प्रशासनाला मात्र याचे सोयरसूतक नाही.

सावित्री खाडीकिनारी गोठे खलाटी व बौद्धवाडी मिळून साठ घरांची वस्ती 
आहे. गोठे गाव ते गोठे खलाटी दरम्यानचा चार किलोमीटर रस्ता घाट व वळणावळणाचा असून अनेक ठिकाणी खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की एसटी महामंडळ धोकादायक रस्ता असल्याचे सांगून गाडी बंद करते. त्यामुळे चार महिने येथील ग्रामस्थांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. तोही अर्धवटच मिळतो. एसटीचा प्रवास करण्यासाठी आठ-नऊ किलोमीटर लांब देव्हारे येथे जावे लागते. त्याचा भुर्दंड पडतो व वेळही जातो. रुग्णांचे हाल होतात.

विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. त्यामुळे ग्रामस्थांनी चांगला रस्ता मिळावा असा तगादा अनेक वेळा लावला आहे. मात्र, निवडणुका आल्यानंतर मतांसाठी येणारे पुढारी रस्त्याबाबत फक्त आश्‍वासने देतात. त्यानंतर ते इकडे फिरकत नाहीत, असे ग्रामस्थ सांगतात. रस्ता हवा म्हणून अनेक वर्षे येथील ग्रामस्थ व महिला श्रमदान करतात. काल (ता. १०) ग्रामस्थ व महिलांनी गौरू बोथरे, रवी पलणकर, शांताराम पलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावरील खड्डे माती टाकून बुजवले. वाढलेली झाडी तोडून दिवसातून एसटीची एकतरी खेप होईल या प्रतीक्षेत आहेत.

दरवर्षीप्रमाणे माती टाकून खड्डे बुजवण्यात आले. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. त्यांनी पत्र देऊन गाडी सुरू करतो असे सांगितले; मात्र ही समस्या कायमस्वरूपी सुटावी यासाठी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे.
- संजय बोथरे, ग्रामस्थ- गोठे खलाटी