पाणी द्या, नाहीतर खुर्च्या सोडा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

रत्नागिरी - नगरपालिका हाय हाय, नगराध्यक्ष हाय हाय; पाणी द्या, नाहीतर खुर्च्या सोडा, अशा जोरदार घोषणा देत कीर्तीनगर येथील रहिवाशांनी पालिकेवर मोर्चा आणला; मात्र संबंधित अधिकारी, पदाधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या संतापाचा पारा चढला. आरोग्य सभापतींसह अन्य नगरसेवकांबरोबर मोर्चेधारकांची शाब्दिक चकमक उडाली. अखेर अर्ध्या तासांनी उपनगराध्यक्ष राजेश सावंत आले. त्यांनी सर्वांना आपल्या दालनात बोलावून घेतले. त्यांचे म्हणणे ऐकूण त्यावर तत्काळ तोडगा काढला. तेव्हा मोर्चेकरी शांत झाले. 

कीर्तीनगर येथील रहिवाशांनी शिवसेनेची सत्ता आल्यानंतर काही दिवसांतच पाण्यासाठी मोर्चा आणला होता. नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या दालनात याबाबत चर्चा होऊन महिन्याभरातच या भागातील पाण्याचा प्रश्‍न सोडवू, असे आश्‍वासन दिले होते. पहाटे चार वाजता पाणी येऊनदेखील त्यांना एक घागर पाणी मिळत नाही. अनेक महिन्यांपासूनची ही परिस्थिती आजपर्यंत सुधारलीच नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सुमारे ४० मलिला व काही पुरुष दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पालिकेवर धडकले. पालिकेत प्रवेश करतानाच त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ते आरोग्य व स्वच्छता समिती सभापती स्मितल पावसकर यांच्या दालनात शिरले. तेथे नगरसेवक बंटी कीर, सोहेल मुकादम, सौ. खेडेकर, सौ. गोदड मॅडम, बारक्‍या हळदनकर आदी उपस्थित होते. मोर्चाची पूर्वकल्पना देऊनही संबंधित सभापती किंवा नगराध्यक्ष उपस्थित नसल्याने मोर्चेकर भडकले. समजावणाऱ्या नगरसेवकांचे म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. एवढे वर्ष काय केले, चार वर्षांपासूनचा हा प्रश्‍न आहे. आता एक हाती सत्ता दिली, आता तरी कामे करा. लोकांचे मूलभृूत प्रश्‍न सोडवा. खुर्च्या उबवू नका, असे मोर्चेकऱ्यांनी सुनावले.  

नगरसेवकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महिला काहीकाळ पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर थांबून राहिल्या. नगराध्यक्ष राहुल पंडित, पाणी सभापती निमेश नायर, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली होती; परंतु कार्यबाहुल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, असे खोचकपणे मोर्चेकऱ्यांनी ऐकवले. अखेर उपनगराध्यक्ष राजेश सावंत आणि नगरसेवक प्रशांत साळुंखे यांनी त्यांना दालनात बोलावून घेतले. तेथेदेखील जमावाने आरोपावर आरोप केले. राजेश सावंत म्हणाले की, तुम्ही सर्वांनी शांत बसा. तुमची समस्या काय हे एकाएकाने शांतपणे सांगा, तर त्यावर तोडगा काढता येईल. वाद घालण्यापेक्षा पाणी कसे मिळेल यावर भर देऊया. त्यांनी लाइनमन आणि पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. वस्तुस्थिती जाणून घेतली. तेव्हा जलवाहिनी खराब असल्याचे लक्षात आले. दुरुस्तीआधी तत्काळ पाण्याचे टॅंकर सुरू करण्यास सावंत यांनी सांगितले. या भागात नवीन ३ इंची जलवाहिनी टाकता येते का ते पाहून चार दिवसांत प्रश्‍न सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. राजेश सावंत यांनी अत्यंत गांभीर्याने ही बाब हाताळून सारे शांत झाल्यावर नगराध्यक्ष राहुल पंडित तेथे आले. त्यांनाही वस्तुस्थिती सांगण्यात आल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले.