कोयनेत गतवर्षीपेक्षा दहा टीएमसी अधिक साठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

चिपळूण - कोयना धरणात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दहा टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. त्यामुळे कोयना प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करून राज्याची विजेची गरज भागवली जात आहे.

चिपळूण - कोयना धरणात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दहा टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. त्यामुळे कोयना प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करून राज्याची विजेची गरज भागवली जात आहे.

कडक उन्हामुळे राज्यात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. महानिर्मिती कंपनीच्या विविध प्रकल्पातून १३ हजार ६०२ मेगावॉट वीज निर्मिती सुरू आहे. यामध्ये कोयना प्रकल्पाचा वाटा १९५६ मेगावॅट इतका आहे. कोयना धरणात पाणी साठविण्याची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. 

वर्षभरात पाण्याचे नियोजनही व्यवस्थित झाले. त्यामुळे धरणात ३३.४१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पूर्वेकडील आणि पश्‍चिमेकडील वीज प्रकल्प सुरू आहेत. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार धरणातील ६७.५ टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी आणि ३५ टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचनासाठी सोडले जाते. आतापर्यंत ६५.१२ टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी आणि ३७.९४ टीएमसी पाण्याचा वापर सिंचनासाठी झाला आहे. धरणातील पाणी साठ्याचे तांत्रिक वर्ष १ जूनपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी धरणातील पाण्याचे नियोजन कोयना धरण सिंचन विभाग आणि महानिर्मिती कंपनीकडून सुरू आहे. 

कोयना प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता १९६० मेगावॉट इतकी आहे. १९५६ मेगावॉट वीज निर्मिती सुरू आहे. कोयना प्रकल्पाचे सर्व युनिट चालू आहेत. त्यामधून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे. प्रकल्पातून दररोज २७.७२५ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होत आहे.
-चंद्रशेखर बाबर, 

मुख्य अभियंता, वीज निर्मिती कंपनी, पोफळी

Web Title: Ratnagiri News water level 10 TMC in Koyana