नाटेतील किल्ले यशवंतगडचा परिसर झाला चकाचक

नाटेतील किल्ले यशवंतगडचा परिसर झाला चकाचक

राजापूर - छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले विविध कारणांमुळे दुर्लक्षित आहेत. गडांवर अस्वच्छता आणि गर्द वनराई वाढली आहे. अशापैकीच एक तालुक्‍यातील नाटे येथील किल्ले यशवंतगडची हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, राजापूर आणि नाटे येथील शिव संघर्ष संघटनेतर्फे शिवकालीन गडकोट स्वच्छता मोहिमेंतर्गत रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 

सोमवारी (ता. १९) शिवजयंती साजरी होत असताना आज राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील नाटे येथे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले यशवंतगडची उभारणी केली होती. या किल्ल्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याच्या पाऊलखुणा आजही साक्ष देत आहेत. लोकवस्तीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या किल्ल्याची पडझड झाली असून बुरूजही ढासळले आहेत. तटबंदीला गर्द वनराईने आच्छादली आहे. किल्ल्याचा परिसरही अस्वच्छ 
होता. 

या किल्ले यशवंतगडची साफसफाई करण्याचा निर्धार हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि शिवसंघर्ष संघटनेच्या शिलेदारांसह शिवप्रेमींनी घेतला. त्यानुसार आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये राजापूर, नाटे, आंबोळगड, जैतापूर, सोलगाव, कशेळी, भालावली यांसह पंचक्रोशीतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छोट्या मुलांसह महिलांही सहभागी झाल्या होत्या.

हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर, शिव संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज आडविलकर, उपाध्यक्ष बाळा कुबडे, राजा छत्रपती परिवार अध्यक्ष अमोल पवार, विशाल हळदणकर, उपसरपंच पुरुषोत्तम थळेश्री, ठेकेदार गदगू जाधव, माजी नगराध्यक्ष अपूर्वा मराठे, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण बाणे, पालिकेतील माजी विरोधी गटनेते अभय मेळेकर, स्थापत्य अभियंता जगदीश पवार, मंदार बावधनकर, सुबोध कोळेकर, विवेक गुरव, मोहन घुमे, ॲड. पराग मोदी, अभिजित नार्वेकर, मंदार पेणकर, मनोज आडविलकर, गौरी अभ्यंकर, संतोष चव्हाण यांच्यासह शिवप्रेमींचा सहभाग होता.

शिवप्रेमींनी किल्ल्यातील आतील परिसराची स्वच्छता करून तटबंदीवर वाढलेली झाडीही तोडली. तसेच किल्ल्याच्या पुढील भागामध्ये किल्ल्याच्या संरक्षणासाठी खोदलेल्या खंदकासह पिण्याच्या पाण्याची विहीर, धान्य कोठार आदी पसिराचीही साफसफाई केली. शिवप्रेमींच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com