एसटी विभाग नियंत्रकांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

रत्नागिरी -  एसटी विभागीय कार्यालयातील लेटलतिफांना आज प्रवेशद्वार, दरवाजे बंद झाले. विभाग नियंत्रकांच्या या ‘सर्जिकल स्ट्राइक’मुळे कर्मचाऱ्यांना मेमो धाडण्यात आले. कामचुकार कर्मचारीही विभाग नियंत्रकांच्या रडारवर आहेत. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई स्वागतार्हच; परंतु जादा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेही सहानुभूतीने पाहिले जावे. कारण सुमारे २५ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. चार अधिकाऱ्यांचा जादा भार कर्मचाऱ्यांवरच दिला आहे. या अतिरिक्त कामाचेही मूल्यमापन व्हावे, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

महाराष्ट्राची लोकवाहिनी असणारी एसटी अत्यावश्‍यक सेवा देते. त्यामुळे विभागीय कार्यालयात मोठी जबाबदारी असते. या कार्यालयात आस्थापना, सांख्यिकी, वाहतूक, लेखा, कामगार, सुरक्षा विभागात सुमारे १०० कर्मचारी कार्यरत आहेत; परंतु काही कर्मचारी उशिरा येतात, काही जण काम करण्यापेक्षा टपरीवर चहा-नाश्‍ता करायला जास्त वेळा जातात, मुलांना शाळेत सोडायला नाही तर दुसऱ्या कामानिमित्त बाहेर फिरणारे कर्मचारीही आहेत. यासंदर्भात काही दिवस तक्रारी येत होत्या. चालक, वाहकांची कामे वेळेवर होत नसल्याची तक्रारही होती. याची दखल घेऊन विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी आज सकाळी १०ः१० ला मुख्य प्रवेशद्वार, दरवाजे बंद केले. त्यावेळी काही कर्मचारी यायचे होते. या ‘सर्जिकल स्टाइक’मुळे कामचुकारांचेही धाबे दणाणले आहेत. 

चालक, वाहकांना कात्रीत पकडणारे कर्मचारी व अधिकारी आज गेटबाहेर होते. यामुळे चालक, वाहकांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू होती. काही चालक, वाहकांनी बारटक्के यांचे अभिनंदनही केले. कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशीन बसवण्याची मागणीही होत आहे.

कर्मचारी जादा कामही करतात
विभागीय कार्यालयातील कर्मचारी कामाच्या वेळेव्यतिरिक्त रात्री ८-१० वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाज करतात. मुंबई प्रादेशिक कार्यालयातून आलेल्या आदेशानुसार माहिती संकलित करण्यासाठी कार्यालय सुटल्यानंतरही थांबावे लागते. गेला महिनाभर कार्यालयातून दररोज रात्री ८ वाजता घरी जात असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. विभागीय कर्मचारीवर्ग अधिकारी, विभागीय सांख्यिकी अधिकारी, विभागीय वाहतूक अधीक्षक अनेक वर्षे नाही. या सर्वांचा जादा भार कर्मचाऱ्यांवर दिला आहे. कामगार अधिकाऱ्यावर तर दोन-तीन ठिकाणचा भार आहे. अशा स्थितीत कर्मचारीही जादा काम करतोय याची दखलही वरिष्ठांनी घ्यावी, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती.

लेटलतिफांचे प्रमाण कमी आहे; परंतु शिस्तीसाठी असे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे आज गेट बंद करण्यात आले. काही कर्मचारी बाहेर होते हे खरेच.
- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.

Web Title: ratnagiri st depo