रत्नागिरी : आंबा चोरीमुळे व्यावसायिक हैराण

खरेदी-विक्री केंद्रात विक्री, सातनंतर केंद्र बंद करण्याची मागणी
 जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना निवेदन देताना आंबा बागायतदार.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना निवेदन देताना आंबा बागायतदार.sakal

रत्नागिरी : बदलते हवामान आणि शासनाकडून प्रश्न सोडवण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे मेटाकुटीला आलेले आंबा व्यावसायिक आता आंबा चोरीमुळे हैराण झाले आहेत. रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या खरेदी-विक्री केंद्रामधून चोरीचा बहुतांशी माल विकला जातो. त्यामुळे बागायतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत रात्रीची खरेदी बंद करण्यासाठी निवेदन दिले.

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रात्री चालणाऱ्या आंबा खरेदी केंद्रावर बंदी घालून हापूस आंबा चोरीवर रोख लावावी. सध्या हापूस आंबा हंगाम चालू असून ज्यांच्या छोट्या-मोठ्या बागा आहेत अशा बागांमधून संध्याकाळ ते मध्यरात्र या वेळात आंबा चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. कारण या चोरी करणाऱ्या माणसाला रात्रीची जी आंबा खरेदी केंद्रे जागोजागी बारा किंवा एक वाजेपर्यंत उघडी असतात त्यांचा विक्रीसाठी जास्त आधार असतो. या केंद्राच्या माध्यमातून चोरीच्या आंब्यांची सर्व विल्हेवाट परस्पर लावली जाते. याबाबत तलाठी, सर्कल आणि पोलिस यांच्यामार्फत याची माहिती करून घेतलीत तर सर्व चोरी साखळीची पूर्ण कल्पना येईल व या सर्व हापूस चोरीला आळा बसू शकेल.

काही बागायतदारांचा रातोरात १० ते ३० क्रेट आंबा चोरी झालेला आहे. रखवालदाराला काही ठिकाणी मारून चोरी केली गेली आहे. प्रकाश लेले, राजेंद्र जाधव, प्रदीप पटवर्धन, माधव गोगटे व इतर अनेक बागायतदारांना असे अनुभव आले आहेत. ही बहुतांशी हापूस आंबा खरेदी-विक्री केंद्रे अनधिकृत आहेत. या केंद्रांनी कृषी खात्यांकडून किंवा अन्य संबंधित खात्यांकडून परवानाही घेतलेला नसतो. या केंद्राकडे विक्रेते म्हणून जीआय रजिस्ट्रेशनही नसते. तरी आपणाकडून त्वरित दखल घेतली जावी आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत त्यांना केंद्रे बंद करण्यासंबंधी सूचना द्याव्यात, अशी विनंती आंबा बागायतदार, व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या वेळी प्रकाश साळवी, मुकुंद जोशी, मंगेश साळवी व अन्य व्यावसायिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com