रत्नागिरी जि. प. अध्यक्षपदी सावंत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

रत्नागिरी - शिवसेनेने धक्‍कातंत्राचा वापर  करीत प्रस्थापितांना बाजूला सारले. जिल्हा परिषद अध्यक्षापदी सौ. स्नेहा सावंत आणि उपाध्यक्षपदी संतोष थेराडे यांची आज निवड केली. दोघांच्या निवडीचा सोपस्कार जिल्हा परिषदेत पार पडला. राष्ट्रवादीने दाखल केलेले अर्ज माघारी घेतल्याने निवड बिनविरोध झाली. 

सौ. सावंत जिल्हा परिषदेवर प्रथमच निवडून आल्या आहेत. थेराडे यांच्याकडे पंचायत समिती उपसभापतिपदाचा अनुभव आहे. रत्नागिरी तालुक्‍याला १७ वर्षांनंतर अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.  रत्नागिरी व संगमेश्‍वरने शिवसेनेच्या पदरात भरघोस माप टाकले, त्याची पावतीही दोन्ही तालुक्‍यांना मिळाली.

निवड झाल्यानंतर दोघांनीही सूत्रे स्वीकारली. यावेळी संपर्कप्रमुख कदम, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, सचिन कदम, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपतालुकाप्रमुख सुकांत सावंत यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी बेलदार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. एस. एस. सावंत  सहायक निवडणूक अधिकारी होते. शिवसेनेचे उमेदवार आज सकाळी निश्‍चित झाले. संपर्कप्रमुख विजय कदम यांनी मातोश्रीवरून आलेली नावे जाहीर केली. त्यानंतर सौ. सावंत यांनी अध्यक्षपदासाठी, तर श्री. थेराडे यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरले. आयत्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सौ. नेत्रा ठाकूर आणि राजू आंब्रे यांनी उमेदवारी अर्ज भरले. अर्जांची छाननी दुपारी तीन वाजता झाली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज  मागे घेतले. शिवसेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

रत्नागिरी तालुक्‍याला १७ वर्षांपूर्वी जयसिंग घोसाळे यांच्या रूपाने सहा महिने कालावधीसाठी अध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर विविध कारणांमुळे संधी हुकली होती. शिवसेनेचे धोरण, आमदार उदय सामंत यांनी केलेला पाठपुरावा यामुळे हा योग जुळून आल्याने रत्नागिरीच्या पदरात अध्यक्षपदाची माळ पडली. त्यामुळे रत्नागिरी तालुक्‍यात उत्साहाचे वातावरण आहे. हजारो शिवसैनिकांनी शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषदेत गर्दी केली होती. सायंकाळी पाच वाजता रत्नागिरी शहरातून अध्यक्षा सौ. सावंत यांच्या मतदारसंघातील मिऱ्या गावापर्यंत मोठी मिरवणूक काढण्यात आली. अध्यक्षपदाचा अधिकृत भार दोघांनीही आजच स्वीकारला. प्रत्यक्ष कामकाज खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सुरू करणार असल्याचे नूतन  अध्यक्षा सौ. सावंत यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri zp election