पंतप्रधान मोदींनीही चांगले निर्णय घ्यावेत - प्रा. उल्हास बापट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

भारताचे बहुतांश पंतप्रधान हे लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ या सर्वांवर प्रभावी ठरले आहेत. वरचढ होणाऱ्यांचे पंख कापायचे व मंत्री बदलायचे, हे फार पूर्वीपासूनच चालू आहे. मात्र, चांगले वागला नाहीत तर जनताच अशा नेत्यांना व राजकीय पक्षांना घरी बसविते. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनीही चांगले निर्णय घ्यावेत, असे सूचक प्रतिपादन भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक प्रा. उल्हास बापट यांनी केले.

रत्नागिरी - भारताचे बहुतांश पंतप्रधान हे लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ या सर्वांवर प्रभावी ठरले आहेत. वरचढ होणाऱ्यांचे पंख कापायचे व मंत्री बदलायचे, हे फार पूर्वीपासूनच चालू आहे. मात्र, चांगले वागला नाहीत तर जनताच अशा नेत्यांना व राजकीय पक्षांना घरी बसविते. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनीही चांगले निर्णय घ्यावेत, असे सूचक प्रतिपादन भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक प्रा. उल्हास बापट यांनी केले.

शिवप्रसाद महाजनी फाउंडेशनतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात कार्यक्रम झाला. या वेळी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन, ॲड. पु. ल. महाजनी व ॲड. रुची महाजनी उपस्थित होत्या. पूर्वा पेठे यांनी निवेदन केले.

प्रा. बापट यांनी पंतप्रधान किती प्रभावी असतात हे उदाहरणांसह पटवून दिले. ते म्हणाले, की दोन तृतीयांश सत्ता मिळविणाऱ्या इंदिरा गांधी यांनी त्यांच्याविरोधात न्यायालयाने निर्णय दिल्यावर चार दिवसांत घटनेतील कलम बदलले व आपली खुर्ची राखली. आणीबाणीनंतर गांधींची सत्ता गेली, जनता सरकारचीही सत्ता गेली व पुन्हा गांधी आल्या. लोकसभा, राज्यसभेत प्रचंड संख्याबळ असेल तर घटनेत बदल होण्याची भीती असते. आता मोदी यांना दोन्ही सभागृहांत बहुमत नसल्याने असे करणे शक्‍य नाही.

या कार्यक्रमात विधी महाविद्यालयातील समृद्धी महाडदळकर, आशिष आठवले, ऋषीकेश वैशंपायन या विद्यार्थ्यांना शिवप्रसाद महाजनी फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रियाली चव्हाण, संकेत नवले यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित कॅप्टन नंदकुमार शिंदे, सुभेदार अंजन पाटील, सीएफएन सुभाष सावंत, नायक संदेश घाग, नायक प्रदीप कांबळे, नायब सुभेदार दिलीप पवार, हवालदार प्रवीण पावसकर, नायब सुभेदार रवींद्र आठल्ये, नायक दीपक आंबवले यांचा सन्मान करण्यात आला.

परदेशातून रंगीत खते आयात केली
नेहरूंपासून मोदींपर्यंत सर्व पंतप्रधान कोणालाही वरचढ होऊ देत नाहीत, असे सांगताना प्रा. बापट यांनी एक किस्सा सांगितला. नेहरूंच्या मंित्रमंडळातील प्रसारणमंत्री वसंत साठे हे नेहमी मी भारतात कलर टीव्ही आणला, असे म्हणायचे. दुसऱ्याच आठवड्यात साठे यांना बदलून खतविषयक खात्याचे मंत्री करण्यात आले. मग ते म्हणू लागले मी परदेशातून रंगीत खते आयात केली.