मुंढर-आडीवाडीत धावली एसटी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

गुहागर -  तालुक्‍यातील दुर्गम भाग असलेल्या मुंढर-आडीवाडीमध्ये पंचायत समिती सदस्य सुनील पवार यांच्या प्रयत्नातून तब्बल पाच पिढ्यांनंतर एसटी धावल्याने तेथील ग्रामस्थांच्या डोळ्यातून आनंदाश्रू टपकले. एसटी वाडीत आल्याने एसटी सजवून, फटाके वाजवून दिवाळीच साजरी केली गेली.

गुहागर -  तालुक्‍यातील दुर्गम भाग असलेल्या मुंढर-आडीवाडीमध्ये पंचायत समिती सदस्य सुनील पवार यांच्या प्रयत्नातून तब्बल पाच पिढ्यांनंतर एसटी धावल्याने तेथील ग्रामस्थांच्या डोळ्यातून आनंदाश्रू टपकले. एसटी वाडीत आल्याने एसटी सजवून, फटाके वाजवून दिवाळीच साजरी केली गेली.

लोकप्रतिनिधींनी एखादे काम करायचे ठरवले तर ते नक्‍कीच होते, असा अनुभव सुनील पवार यांच्या माध्यमातून पाहावयास मिळाला. पंचायत समिती निवडणूक प्रचारादरम्यान आडीवाडी येथील ग्रामस्थांची प्रमुख अडचण महिलावर्गाने समोर ठेवली. दोन वाड्या असलेल्या या आडीवाडीमध्ये तब्बल ६०० लोकसंख्या आहे. गुहागर आगाराची एसटी फेरी आडीवाडीच्या आधी तीन किमी अंतरावरील वळवणवाडी इथपर्यंत येत होती. कोणी आजारी पडल्यास खांद्यावरून उचलून न्यावे लागत होते.

विद्यार्थ्यांनाही पायपीट करावी लागत होती. सुनील पवार यांनी ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले. येथील ग्रामस्थांच्या प्रमुख अडचणीबाबत गुहागर आगाराजवळ पत्रव्यवहार व प्रत्यक्ष बोलणी करून आगाराच्या मदतीने ओळवणवाडीपर्यंत एसटी फेरी नेण्याची मंजुरी घेतली. त्यामुळे आडीवाडीपर्यंत एसटी फेरी सुरू झाली. दिवसातून तीन फेऱ्या आडीवाडी येथे जात आहेत. आडीवाडी येथे एसटीचा प्रारंभ करताना एसटी सजविण्यात आली होती. गावातीलच वयोवृद्धांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फटाके फोडून फेरीचा प्रारंभ झाला. 

सुनील पवार यांचा ग्रामस्थांनी खास सत्कार केला. सुनील पवार यांनी याअगोदर पाणीटंचाईवेळी आडीवाडी व वळवणवाडीला टॅंकरने पाणीपुरवठा केला होता. या वेळी सुनील पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, प्रभाकर शिर्के, डॉ. प्रकाश शिर्के, मुंढरचे उपसरपंच रवी चिले, पोलिसपाटील किरण धनावडे, लक्ष्मण मोरे, प्रकाश मोरे, विजय गोरिवले, हरिश्‍चंद्र मोरे, तुकाराम माळी, बबन गोणबरे, अनिल अवरे, गजानन मोरे, सुनील मोरे, अनंत सुवरे, गणपत सुवरे, परशुराम जोगळे, शिवराम गोरिवले, रत्नाकर मोरे, अनंत मोरे, चंद्रकांत जोगळे, संतोष चांदवडे, हरिश्‍चंद्र गोरिवले, विजय सुवरे, रघुनाथ सुवरे, शांताराम सुवरे, सखाराम सुवरे, प्रकाश माळी आदी उपस्थित होते.

Web Title: Ratngairi News ST service starts in Mudhar-Adiwadi