जमीन अपुरी; दापोलीत रिफायनरी अशक्‍य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

या प्रकल्पाचे तोटे काय, कोणते विषारी वायू प्रकल्पामधून निघतील, जनजीवनावर व पर्यावरण किती गंभीर परिणाम होईल, याचा अभ्यास करून माझ्याकडे पत्र द्या, मग मी तुमच्यासाठी विधिमंडळात भांडेन, असे उत्तर पालकमंत्र्यांनी दिले होते.

गावतळे : तेल शुद्धीकरण प्रकल्पाला आवश्‍यक असणारी जमीन दापोली तालुक्‍यात उपलब्ध नसल्याने एचपीसीएलची रिफायनरी गावतळे परिसरात येणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी आज दापोली येथे दिली. हा प्रकल्प होऊ नये, अशी विनंती करण्यासाठी कोकण पर्यावरण बचाव समितीने गिते यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. यामुळे गावतळे, वाकवली परिसरांतील 13 गावांतील लोकांनी आनंद व्यक्त केला.
गिते म्हणाले, की मी सहा वेळा खासदार व तीन वेळा केंद्रीय मंत्री झालो. केंद्र सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पातून माझ्या मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता. यासाठी हा प्रकल्प माझ्या मतदारसंघात व्हावा म्हणून मी आग्रही होतो; पण येथील जनतेची घरे विस्थापित करून व शेतजमिनींवर नांगर फिरवून मी कोणताही प्रकल्प राबविणार नाही. दापोलीमध्ये प्रकल्पाला आवश्‍यक असणारी 15 हजार एकर जमीन आम्हाला उपलब्ध झाली नाही. त्यामुळे हा प्रकल्प दापोलीत होणार नाही, हे निश्‍चित झाले आहे. आता हा प्रकल्प जेथे पडीक जमीन उपलब्ध होईल, तेथे उभारला जाईल.

पालकमंत्र्यांनी टोलवले, केंद्रीय मंत्र्यांनी वाचविले
या आधी दापोलीत रिफायनरी होऊ नये म्हणून विनंती करण्यासाठी कोकण पर्यावरण बचाव समितीचे कार्यकर्ते पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे गेले होते. त्यावेळी या प्रकल्पाचे तोटे काय, कोणते विषारी वायू प्रकल्पामधून निघतील, जनजीवनावर व पर्यावरण किती गंभीर परिणाम होईल, याचा अभ्यास करून माझ्याकडे पत्र द्या, मग मी तुमच्यासाठी विधिमंडळात भांडेन, असे उत्तर पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे पर्यावरण समितीला धक्का बसला होता; परंतु केंद्रीय मंत्र्यांच्या आश्‍वासनाने आम्ही निर्धास्त झालो, अशी प्रतिक्रिया समितीचे संदीप जोशी, भाई पवार, भरत दाभोळकर यांनी व्यक्त केली.

दापोली ः कोकण पर्यावरण बचाव समितीच्या कार्यकर्त्यांबरोबर केंद्रीय मंत्री अनंत गिते.

Web Title: refinery not possible in dapoli