मोबाईल व सोशल मिडीयामुळे कोंडिंबांचा पुस्तक रथ झाला संथ

kondiba
kondiba

पाली - वाचन संस्कृती टिकावी आणि जनसामान्यांमध्ये वाचनाची आवड व गोडी निर्माण व्हावी यासाठी कोंडीबा नागनाथ घोडके यांनी फिरते बुक स्टॉल सुरु केले होते. मात्र मोबाईल, इंटरनेट व सोशल मिडीयाच्या वाढत्या वापरामुळे वाचन संस्क्॒ती हळुहळु लोप पावत चालली आहे. अखेर नाईलाजाने कोंडिंबा यांना पोटाची खळगी भरण्यासाठी ठिकठिकाणी पापड, चॉकलेट्स व बिस्किटे विकावी लागत आहेत. 

सकाळने कोंडीबाच्या या पुस्तक रथाची माहिती चार वर्षापुर्वी दिली होती. मुळचे लातुर जिल्हयातील असलेले कोंडीबा नागनाथ घोडके मागील दिड दशकांपासून पासून पेण येथे राहत आहे. गेली सोळा वर्षे गावोगाव जाऊन अगदी अत्यल्प नफ्यात पुस्तक विक्री करुन ते आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. त्यांनी काही वर्षांपुर्वी गाडी घेवुन (पिकअप टेम्पो) त्यामध्ये फिरते बुक स्टॉल सुरु केले. सुरुवातीस हा व्यवसाय खुप चांगल्या प्रकारे सुरु होता. लोक आवर्जून विवीध प्रकारची पुस्तके खरेदी करत असत. मात्र सध्या इंटरनेट व मोबाईलचा वाढता वापर आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या जमान्यात लोकांनी वाचनाकडे पाठ फिरविली आहे. असे कोंडिंबाने सकाळला सांगितले. परिणामी पुस्तकांच्या या रथाचा वेग मंदावला आहे.

पोटापाण्यासाठी नाईलाजाने कोंडीबाला आपला आवडत्या व्यवसायाला पाठी सोडून पापड, कुरडया, चॉकलेट व बिस्किट विक्रिचा व्यवसाय करावा लागत आहे. सध्या कोंडीबा विविध सेलमध्ये हे जिन्नस विकतात. मात्र या सर्व पदार्थ्यांसोबतच पुस्तके देखिल विक्रिसाठी ठेवतात. फायदा मिळविण्यासाठी नाही तर किमान या वस्तु खरेदी करतांना लोकांची नजर पुस्तकांवर जाईल आणि एखादे पुस्तक ते वाचनासाठी घेतील. असा त्यांचा उद्देश आहे. 

कोंडीबांच्या गाडीत दिड ते दोन हजार अशी वेगवेगळया विषयाची आणि प्रकाशनाची पुस्तके नेहमी असायची. कादंबरी, स्पर्धा परिक्षांच्या पुस्तकां पासून ते विविध कायदयाची व शासनाच्या आयोगाची अशी दुर्मिळ, दर्जेदार व माहितीपर पुस्तके त्याच्याकडे होती. सुरुवातीस दिवसाला एक ते दोन हजाराची पुस्तके विकली जायची. काही गरजु विद्द‍यार्थ्यांना व वाचन प्रिय गरिब लोकांना आलेल्या किंमतीमध्ये देखील पुस्तके द्यायचा. सध्या पाचशे रुपयांची पुस्तके सुद्धा विकली जात नसल्याची खंत कोंडिबांनी व्यक्त केली.

कोंडिबा यांनी २००१ साली बारावीतुन शिक्षण सोडले आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये एका कंपनीत कामाला लागले. तिथे मन काही लागत नव्हते. त्यादरम्यान पुण्याला भावाकडे येणे जाणे सुरु होते. तिथेच पुस्तक वाचनाचा छंद जडला. आणि मग पुस्तक विक्रीचा धंदा सुरु केला. त्यानंतर वाटले की जर आपण वाचकांकडेच प्रत्यक्ष जाऊन पुस्तके दिली तर अधिक लोकांपर्यंत पुस्तके नेता येतील, म्हणुन मग त्यांनी फिरता पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरु केला.

इंटरनेट, मोबाईल व सोशलमिडियामुळे या व्यवसायाला आता उतरती कळा लागली आहे. अधिक लोकांपर्यंत पोहचुन त्यांना पुस्तकांचे आणि वाचनाचे महत्व पटवावे व त्याद्वारे लोकांचे प्रबोधन करावे हे ध्येय होते. तरी अजुनही पुर्णपणे हा व्यवसाय सोडलेला नाही.
कोंडीबा नागनाथ घोडके, पुस्तकविक्रेता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com