रिक्षा संघटनेतर्फे आज जिल्ह्यात बंदची हाक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

कुडाळ - विविध न्यायासाठी उद्या (ता.३१) सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षाचालक मालक संघटना रिक्षा बंद ठेवणार आहे. यावर आठ दिवसांत दखल न घेतल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा इशारा संघटनेचे जिल्हा सल्लागार उदय बल्लाळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की महाराष्ट्र प्रदेश कमिटीतर्फे परिवहन विभागाकडून तसेच इन्शुरन्स कंपनीकडून होणारी वाहनचालक-मालक यांची लूट, महाराष्ट्र परिवहन खाते सिंधुदुर्ग यांची चालणारी मनमानी याबरोबरच परिवहन अधिकारी कोणतीही गोष्ट ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत, आम्ही सांगू तोच कायदा अशाप्रकारे वाहनचालक-मालक यांना वागणूक मिळत आहे. याविरोधात जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटना सिंधुदुर्ग यांनी ३१ ला महाराष्ट्र प्रदेश कमिटीला जिल्ह्यातील सर्व रिक्षा बंद ठेवून पाठिंबा देण्याचे ठरविले आहे.

जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालक-मालक यांनी आपल्या रिक्षा बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले. या बंदनंतर आठ दिवसांनी न्याय न मिळाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल व त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी शासनावर राहील.