संगमेश्‍वरात बहुतांशी भागात नद्या-नाले, बंधारे कोरडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

देवरूख - ऐन मार्च महिन्यातच वाढलेल्या उष्म्यामुळे संगमेश्‍वर तालुक्‍यातील बहुतांशी भागातील नदी-नाले आणि बंधारे सुकल्याने यावर बांधण्यात आलेले वनराई आणि सिमेंटचे बंधारे आता केवळ शोभेची वस्तू बनून राहिले आहेत.

देवरूख - ऐन मार्च महिन्यातच वाढलेल्या उष्म्यामुळे संगमेश्‍वर तालुक्‍यातील बहुतांशी भागातील नदी-नाले आणि बंधारे सुकल्याने यावर बांधण्यात आलेले वनराई आणि सिमेंटचे बंधारे आता केवळ शोभेची वस्तू बनून राहिले आहेत.

दरवर्षी शासनाकडून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. पाणी अडवा पाणी जिरवा या घोषवाक्‍याखाली पाणीटंचाई निवारण्याचे उपाय राबविले जातात. दरवर्षी शिमगोत्सवाला सुवात झाली की, कोकणातील उष्म्यामध्ये प्रचंड वाढ होते. नंतर भाजावळीच्या कालावधीत तर गरम्याने नाकीनऊ येते. एप्रिल आणि मे महिना तर कोकणात गरम्याने हैराण करून सोडतो. यावर्षी मार्चच्या सुरवातीलाच उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या आहेत. गेले दोन तीन दिवस तर संगमेश्‍वर तालुक्‍यातीलच तापमान ३६ ते ३८ डिग्रीवर जाऊन पोचले आहे. त्यात शिमगोत्सव सुरू असल्याने वातावरणातील पारा आणखीनच वाढला आहे.  

या वेळी कडक उन्हाळा लवकर सुरू झाला आहे तर गतवर्षी जिल्ह्यात सरासरी एव्हढा पाऊस पडूनही यावर्षी टंचाईचे संकट गडद आहे. सद्यःस्थितीत जिल्हाभरातील नदी-नाले मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच कोरडे पडू लागल्याचे चित्र दिसत होते. फेब्रुवारीत तर संगमेश्‍वर तालुक्‍यातील बहुतांशी प्रमुख नद्यांच्या पात्रात खडखडाटच झाल्याचे पाहायला मिळाले. मार्च महिन्यात याच नद्यांमधील डबक्‍यांमध्ये असणारे पाणीही संपून गेल्याचे दिसत असून आता संपूर्ण तालुकाच या रूपाने कोरडा पडल्याचे दिसत आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पावसाळा संपताक्षणी तालुकाभरात असंख्य वनराई आणि सिमेंटचे बंधारे बांधण्यात आले होते. एवढे करूनही जेव्हा पाणी वाहत होते त्याचवेळी बंधारे बांधणे आवश्‍यक असताना पाणी वाहायचे थांबल्यावर हे बंधारे बांधण्यात आल्याने ऐन मार्च महिन्यातच पाणीटंचाईची झळ बसायला सुरवात होताच या बंधाऱ्यांमधील पाण्याचे नामोनिशाण मिटल्याचे दिसत आहे. तालुकाभरात खर्च करून आणि ग्रामस्थांचे श्रमदान करून उभारण्यात आलेले हे बंधारे सध्या कोरडेच असल्याने त्यासाठी वापरण्यात आलेल्या सिमेंटच्या रिकाम्या पोतळ्या केवळ शोभेची वस्तू बनून पडून राहिल्याचे दिसत आहे.

Web Title: river, dranage, dam empty