नदी पुनरुज्जीवनाने "जाणीव' वाढवली

नदी पुनरुज्जीवनाने "जाणीव' वाढवली

रत्नागिरी - रत्नागिरीतील आसमंत बेनोव्हलन्स फाउंडेशन आणि जाणीव फाउंडेशन या दोन्ही संस्था आपापल्या पद्धतीने पर्यावरण रक्षणासाठी कार्य करीत आहेत. एमआयडीसीमध्ये सहा एकरांवर वनस्पती उद्यानाचा प्रकल्प "आसमंत'ने सुरू केला आहे. जाणीव फाउंडेशनने तालुक्‍यातील जांभरूणमध्ये ग्रामस्थांच्या मदतीने नदीचे पुनरुज्जीवन सुरू केले आहे. जांभरूण गावात पूर्वी पाण्याचे पाट वाहत होते. आता पुन्हा हे पाट वाहतील आणि दुबार शेती सुरू होईल याकरिता जाणीवचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत. 

जांभरूणमध्ये जाणीवचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी तीन किलोमीटर नदीतील गाळ काढण्यास प्रारंभ केला. अवघ्या आठवड्याभरात हे काम पूर्णत्वास जात आहे. गाळामुळे नदीत पाणी नव्हते, पण गाळ साफ केल्यावर आता भरपूर पाणी साठू लागले आहे. जांभरूणमध्ये नदी पुनरुज्जीवनासाठी जलप्रतिष्ठानच्या उल्हास परांजपे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. भविष्यात पाणीटंचाई भासू नये याकरिता पाण्याचे नियोजन करण्यात त्यांची मदत होणार आहे. सरपंच सुनयना थेराडे यांच्यासमवेत सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहभागातूनच हे शक्‍य होणार असल्याचे जाणीवचे अध्यक्ष महेश गर्दे यांनी सांगितले. 

आसमंत संस्था सहा वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांचा विकास, शास्त्रीय संगीत प्रसार आणि पर्यावरण रक्षणाचे काम करीत आहे. आसमंतने गेल्या पावसाळ्यात एमआयडीसीत वनस्पती उद्यानास प्रारंभ केला. यात औषधी व देशी अशा 125 झाडांची लागवड केली आहे. येथे विविध कीटक, पक्षी यावेत, त्यांचा अधिवास वाढेल, असे फाउंडेशनचे प्रमुख व उद्योजक नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितले. सीडबॅंकही सुरू करण्यात येणार आहे. निसर्गप्रेमी व अभ्यासकांसाठी हे उद्यान खुले केले जाईल. 

किनारपट्टीला खारफुटीची लागवड 

विद्यार्थी व लोकसहभागाने जलसंवर्धन करण्यात येणार असून किनारपट्टीला खारफुटीची लागवड केली जाणार आहे. एमआयडीसीत पावसाळ्यात नवीन झाडे लावणार असून त्यानंतर मोठा तलाव बांधण्यात येणार आहे. त्यात मासे सोडण्यात येतील. त्यामुळे पक्ष्यांना खाद्य मिळेल, असे नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com