रस्ता दुरुस्तीचे 'थर्ड पार्टी ऑडिट'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

चिपळूण - शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामात ठिकठिकाणी नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने रस्ते दुरुस्ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पालिकेतील सत्ताधारी भाजपकडून रस्त्याच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट होणार आहे. तत्पूर्वी, नागरिकांनी ठेकेदाराचे पितळ उघडे पाडल्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

चिपळूण - शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामात ठिकठिकाणी नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने रस्ते दुरुस्ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पालिकेतील सत्ताधारी भाजपकडून रस्त्याच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट होणार आहे. तत्पूर्वी, नागरिकांनी ठेकेदाराचे पितळ उघडे पाडल्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील नागरिकांना पावसाळ्यात खड्डयांचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले; परंतु माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली गेल्याचा आरोप केला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितल्यामुळे निविदा प्रक्रिया रखडली. त्यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण करत निविदा प्रक्रिया झाली; मात्र पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रस्ते दुरुस्तीचे श्रेय राष्ट्रवादीला मिळू नये म्हणून पुन्हा राजकारण खेळले गेले.

निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हातून पालिकेची सत्ता गेली. खुर्चीतून पायउतार होण्यासाठी राष्ट्रवादीने रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करून वचनपूर्ती केल्याचा दावा केला. शहरातील 11 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून निधी न मिळाल्यामुळे पालिकेच्या फंडातून पैसे खर्च केले आहेत. नागरिकांकडून कराच्या स्वरूपात गोळा होणाऱ्या निधीचा वापर रस्ते दुरुस्तीसाठी खर्च होत असल्याने काम दर्जात्मक व्हावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे; मात्र, नागरिक ठेकेदाराच्या कामात चुका काढत असल्यामुळे कामाबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. मुकादम यांनी चिंच नाका येथे ठेकेदाराची चूक समोर आणली. मच्छी मार्केट येथील नागरिकांनी कामातील त्रुटी उघड केल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले. दोन्ही ठिकाणी झालेली चूक कबूल करून ती दुरुस्त करण्याची ग्वाही ठेकेदाराने दिली. बीबीएमचे काम झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे; मात्र डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुरू असल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये प्रश्‍नचिन्ह आहे. डांबरीकरणाचे काम सुरू असताना त्या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवणे गरजेचे असताना तसे झालेले नाही. काही ठिकाणी वाहनांच्या चाकांमुळे रस्त्यावर रेषा पडल्या आहेत. डांबराचे प्रमाण, रस्त्याची लेवल, दुरुस्त केलेल्या रस्त्याची लांबी-रुंदी याबाबत नागरिकांमध्ये संशय आहे.

"रस्ते दुरुस्तीच्या कामाची निविदा 10 टक्के जादा दराने मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेचे सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले आहे. निविदा प्रक्रियेत स्पर्धा झालीच नाही. माजी बांधकाम सभापती बरकत वांगडे यांनीही याबाबत आवाज उठविला आहे. याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या सर्व बाबी मी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे.''
- इनायत मुकादम, माजी नगरसेवक

Web Title: Road repairing with Third Party Audit