सिंधुदुर्गातील रस्ते दर्जेदारच व्हायला हवेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

कणकवली - भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर रस्ते कामांसाठी कोट्यवधींचा निधी आला आहे. हा निधी आम्ही वाया जाऊ देणार नाही. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची कामे दर्जेदारच व्हायला हवीत, अन्यथा जेथे निकृष्ट काम होईल तेथेच आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिला.

कणकवली - भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर रस्ते कामांसाठी कोट्यवधींचा निधी आला आहे. हा निधी आम्ही वाया जाऊ देणार नाही. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची कामे दर्जेदारच व्हायला हवीत, अन्यथा जेथे निकृष्ट काम होईल तेथेच आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिला.
भाजप प्रदेश सदस्या प्रज्ञा ढवण यांच्यासह तालुका अध्यक्षा गीतांजली कामत, उपाध्यक्षा सुप्रिया तायशेटे, शहराध्यक्षा प्राची कर्पे, सुरेखा भिसे, जयमाला मसूरकर, विशाखा परब, क्षमा देसाई आदींनी आज सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी दर्जेदार रस्ते होण्यासाठी बांधकाम विभागाने दक्ष राहावे, असे आवाहन केले.

तालुक्‍याच्या अनेक भागांत वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी केलेले रस्ते अजूनही शाबूत आहेत; मात्र गेल्या काही वर्षांत झालेल्या रस्त्यांचे खडीकरण आणि डांबरीकरणाची कामे वर्षभरही टिकत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. रस्ते खराब झाल्यानंतर बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार हात झटकतात. सर्वसामान्य जनतेला खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागतो. अशी परिस्थिती आम्ही यापुढे होऊ देणार नाही. प्रत्येक नागरिकाच्या मनात भाजप सरकारबाबत चांगली प्रतिमा आहे. ठेकेदारांच्या चुकीच्या कारभारामुळे आम्ही ती डागाळू देणार नाही, असा इशारा भाजप प्रदेश सदस्या प्रज्ञा ढवण यांनी दिला.

दरम्यान, आतापर्यंत ज्या ज्या कामांच्या तक्रारी आल्या आहेत, त्या सर्व कामांची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे. यात सर्व कामे चांगल्या दर्जाची झाली असल्याचे कार्यकारी अभियंता श्री. व्हटकर म्हणाले. याखेरीज ज्या कामांच्या दर्जाबाबत साशंकता आहे, त्या ठेकेदारांना पुढील वर्षाखेरीज बिले आदा केली जाणार नाहीत. येत्या पावसाळ्यात जर नव्याने डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर खड्डे पडले तर ते त्या ठेकेदारांकडून बुजवून घेण्यात येतील, अशी ग्वाही श्री. व्हटकर यांनी दिली. बांधकाम विभागाकडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे.

एकाच वेळेच पाच ते सहा ठिकाणी कामे सुरू असतात. त्यामुळे सर्वच ठिकाणी सतत लक्ष ठेवणे शक्‍य होत नाही. तरीही सर्व रस्त्यांची आम्ही स्वत: पाहणी करीत आहोत, अशी ग्वाहीदेखील श्री. व्हटकर यांनी दिली.
भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी लेखी आश्‍वासनाची मागणी केली. जी कामे निकृष्ट झाल्याचा आरोप आहे, तसेच ज्या कामांची बिले एक वर्षानंतर दिली जाणार आहेत, त्याची माहिती लेखी स्वरूपात द्या, असे ढवण म्हणाल्या. तसेच कोणतेही काम निकृष्ट होऊ नये याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावे. तसे न झाल्यास भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Roads should be sindhudurg quality