‘एस क्रिएटर’ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

सावर्डे - सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री पॉलिटेक्‍निकमध्ये आयोजित एस क्रिएटर प्रदर्शनास विविध स्तरातील मान्यवरांनी चांगला प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी बनवलेले प्रकल्प आणि कारची पाहणी करून कौतुक केले.

सावर्डे - सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री पॉलिटेक्‍निकमध्ये आयोजित एस क्रिएटर प्रदर्शनास विविध स्तरातील मान्यवरांनी चांगला प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी बनवलेले प्रकल्प आणि कारची पाहणी करून कौतुक केले.

सह्याद्रीच्या विद्यार्थ्यांनी रतन टाटा यांच्यापेक्षा एक पाय पुढे टाकत केवळ ९० हजारात ॲटम-०१७ कार बनवून औद्योगिक क्षेत्राचे लक्ष वेधले. ३ व ४ मार्चदरम्यान झालेल्या एस क्रिएटर प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी आणि नागरिकांनी भेट दिली. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सह्याद्रीच्या फार्मसी, आयटीआय, एटीडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबर नागरिकांनी भेट दिली. उद्योजक केतन पवार, सचिन पाकळे, ऋग्वेद पवार, प्राचार्य माणिक यादव, तानाजी कांबळे, दुबई येथील नामांकित कंपनीत असलेला सागर देसाई तसेच माजी विद्यार्थ्यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

उद्योजक सचिन पाकळे यांना कार चालवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी ॲटम कार विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली.
 

जगातील नामांकित कंपन्यांच्या तुलनेत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कार या गरिबांसाठी परवडतील अशा आहेत. कार घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
- सचिन पाकळे (उद्योजक)

काही थोडे बदल केल्यास ही कार फॉर्म्युला १ रेस ट्रॅकवर उतरण्यास लायक आहे. आधुनिक तंत्रज्ञान थोडे वापरल्यास जगातील सर्वात स्वस्त किमतीची रेस कार गणली जाऊ शकेल.
- मानस दळवी, जी. एस., मर्सिडेज बेंझ, मुंबई

प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेले प्रकल्प अतिशय उत्कृष्ट आहेत. विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत कौतुकास्पद आहे.
- केतन पवार, उद्योजक

उत्कृष्ट बांधणी आणि कमी किमतीमध्ये आकर्षक कार लक्षवेधी आहे.
- अभिजित ठानगे, जनसंपर्क अधिकारी, मिटकॉन मॅनेजमेंट इिन्स्टट्यूट, पुणे

Web Title: s creator exhibition spontaneous reaction