निधीच नसल्याने साकवांची स्थिती ‘जैसे थे’

कळंबुशी येथील कोसळलेला साकव.
कळंबुशी येथील कोसळलेला साकव.

रत्नागिरी - जिल्ह्यातील ६३८ साकवांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटींच्या विशेष निधींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र अद्यापही निधीच आलेला नसल्याने साकवांची कामे जैसे थेच आहेत. साकव दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सहा महिन्यांपूर्वीच शासनाकडे पाठविला होता. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत साकव दुरुस्तीचे काम जिल्हा परिषद बांधकामकडून सार्वजनिक बांधकामकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला. त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.

कळंबुशी येथील दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील साकव दुरुस्तीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. आता तरी प्रशासन जागे होईल का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात नादुरुस्त साकव कोसळून दुर्घटना घडतात. यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्‍न केला होता. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून नादुरुस्त साकवांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला. जिल्ह्यात १,०९२ साकव बांधण्यात आले आहेत. त्यातील काही साकव ३० ते ३५ वर्षांपूर्वीचे आहेत. ३१ साकव पुनर्बांधणी करण्यासाठी ४ कोटी ९२ लाख रुपये आवश्‍यक आहेत. ६०७ साकवांच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी ६६ लाख रुपयांची गरज आहे. दोन्ही मिळून १७ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे.

दुरुस्तीचा प्रश्‍न ऐरणीवर आल्यानंतर साकवाविषयी बांधकाम मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी रत्नागिरी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह बांधकाम विभागचे सचिव उपस्थित होते. त्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर पुरवणी अर्थसंकल्पात १५ कोटी रुपये तरतूद करण्याचा निर्णय झाला. जिल्हा परिषद विभागाकडे साकवांसाठी वेगळे लेखाशीर्ष (हेड) नसल्याने ती कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याच्या सूचनाही या वेळी दिल्या होत्या.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या बैठकीनंतरही अद्यापही निधी प्राप्त झालेला नाही. साकवांचे आयुष्य २५ वर्षे इतके असते. आयुर्मान संपुष्टात आल्याने अनेक साकव धोकादायक बनले आहेत. कळंबूशी येथे होळी नेत असताना साकव कोसळून अनेकजण जखमी झाले. त्यातील पाच जणांची स्थिती अद्यापही गंभीर आहे. दोन वर्षांपूर्वी चिपळुणात ऐन गणेशोत्सवात साकव कोसळून दुर्घटना घडलेली होती. त्यानंतरही साकव दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून पावले उचललेली नाहीत.

तालुका      साकव     अंदाजित रक्‍कम (लाख)
* मंडणगड      २८            १०२.००
* दापोली        ३२           ११०.००
* खेड           ९७           २२१.३०
* चिपळूण      १०८          ३३५.६५
* गुहागर         ७०           १७३.४५
* संगमेश्‍वर      ३२           १११.७५
* रत्नागिरी       ९१           १६५.८५
* लांजा          ८७           ३१६.८५
* राजापूर        ९३           २२२.६०

साकवांसाठी निधी मंजूर झाला आहे; परंतु लेखाशीर्ष नसल्याने साकव दुरुस्ती कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत ही कामे केली जाणार आहेत.

- रवी घुले, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com