सावंतवाडीत महावितरणची चार लाखांची हानी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

सावंतवाडी - वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गेल्या आठवडाभरात महावितरणचे तालुक्‍यात चार लाखांचे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत कलंबिस्त, शिरशिंगे, सोनुर्ली, तळवडे येथील काही भाग अजूनही काळोखात आहे. तेथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांनी दिली.

जिल्ह्यात पावसाचा जोर गेले काही दिवस वाढला आहे. त्यात तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असा दावा श्री. राजे यांनी केला. याबाबत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘सद्य:स्थिती लक्षात घेता जिल्ह्यात अन्य ठिकाणी सुध्दा खांब तुटण्याचे प्रकार झाले आहेत. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर काम करणारे कामगार सद्यस्थितीत तब्बल सात ठिकाणी काम करीत आहेत. तालुक्‍याचा विचार करता फक्त दोन कंत्राटदार देण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थिती काम करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सद्यस्थिती लक्षात घेता कलंबिस्त, शिरशिंगे, सांगेली, सोनुर्ली, तळवडे आदींसह शेजारील गावात वीजपुरवठा खंडित आहे. त्या ठिकाणच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार तेथील पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.’’ 

तो अपघात कारमुळेच
या वेळी श्री. राजे म्हणाले, ‘‘काल (ता. २८) तीन मुशी परिसरात घडलेला अपघात हा कारने धडक दिल्यामुळेच झाला आहे. त्याचे आवश्‍यक ते पुरावे जमविण्याचे काम सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संबंधित कार चालकावर पोलिस ठाण्यात तक्रार देणार आहे. यात सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.’’