चव्हाणांकडून कॉंग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न - नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

सावंतवाडी - नारायण राणे यांना न बोलावता कॉंग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीवरून येथे शुक्रवारी घमासान झाले. यात कॉंग्रेसचे नेते विकास सावंत यांच्यासह अन्य नेत्यांना "टार्गेट' करण्यात आले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण घाणेरडे राजकारण करीत आहेत, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी या वेळी केला.

सावंतवाडी - नारायण राणे यांना न बोलावता कॉंग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीवरून येथे शुक्रवारी घमासान झाले. यात कॉंग्रेसचे नेते विकास सावंत यांच्यासह अन्य नेत्यांना "टार्गेट' करण्यात आले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण घाणेरडे राजकारण करीत आहेत, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी या वेळी केला.

त्याआधी ओसरगाव येथे झालेल्या बैठकीत राणे यांनी कॉंग्रेस आपल्या बाजूने शंभर टक्के असल्याचा दावा केला; तर सावंतवाडीतील बैठकीत राणेसमर्थकांनी मोठ्या संख्येने येत बैठकच "हायजॅक' केली. यात नीतेश राणे यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण हेच जिल्हा कॉंग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विश्‍वासात न घेता कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे आयोजित केलेली निष्ठावंत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक वादात सापडली. बैठक आयोजित केल्याच्या गैरसमजातून प्रांतिक सदस्य सावंत यांना "टार्गेट' करण्यात आले. खासदार हुसेन दलवाई आणि अन्य पदाधिकारी व आमदार नीतेश राणे यांच्यात वाद झाले.

कॉंग्रेस माझ्याबरोबर - राणे
कणकवली - 'जिल्ह्यातील शंभर टक्के कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहेत,'' असा दावा कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी आज येथे केला. राणेंच्या कथित भारतीय जनता पक्षप्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित जिल्हा कॉंग्रेसच्या बैठकीत शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. प्रदेश कॉंग्रेसतर्फे सावंतवाडीतही दुसरी बैठक आयोजित करण्यात आल्याने कॉंग्रेसअंतर्गत संघर्षाला यानिमित्ताने तोंड फुटले आहे. राणेंचा भाजपप्रवेश लांबल्याने आजच्या बैठकीत 325 ग्रामपंचायती आणि थेट सरपंचांच्या निवडणुका कॉंग्रेस पक्षाच्या पॅनेलच्या माध्यमातून लढविण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.

'निमंत्रण नसल्याने गेलो नाही'
'नांदेडमध्ये पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा दौरा असताना आपण का गेला नाहीत, असे विचारले असता श्री. राणे म्हणाले, 'मला पक्षाकडून आमंत्रण दिलेले नाही. मी पक्षाचा पदाधिकारी आहे. त्यामुळे निमंत्रण न देता मी नांदेडला गेलो असतो, तर राहुल गांधींना आवडले नसते. मी माझे आत्मचरित्र लिहीत आहे, ते प्रसिद्ध झाल्यानंतर वाचा.''