राणेंचा राजकीय भूकंप म्हणजे पेल्यातले वादळ - केसरकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

सावंतवाडी - ‘‘नारायण राणेंचा राजकीय भूकंप म्हणजे पेल्यातील वादळ आहे. ते सर्व काही स्वार्थासाठी आहे. स्वार्थासाठी भूकंप करणाऱ्यांचा कधी फायदा होत नाही,’’ अशी टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

सावंतवाडी - ‘‘नारायण राणेंचा राजकीय भूकंप म्हणजे पेल्यातील वादळ आहे. ते सर्व काही स्वार्थासाठी आहे. स्वार्थासाठी भूकंप करणाऱ्यांचा कधी फायदा होत नाही,’’ अशी टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

वाढदिवसाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. केसरकर यांनी आज येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी कोंडुरा येथील मतिमंद मुलांची शाळा, अणाव येथील आनंदाश्रम आदी ठिकाणी भेटी दिल्या. राणेंच्या कथित भाजप प्रवेशाविषयी गेले काही दिवस चर्चा सुरू आहे. यावरून राणेंची काही वक्तव्येही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. या पार्श्‍वभूमीवर विचारलेल्या प्रश्‍नावर श्री. केसरकर म्हणाले, ‘‘कोकणात एक तर भूकंप होत नाही आणि भूकंप झाला तर मोठा होतो. राणेंचा भूकंप हे पेल्यातील वादळ आहे. राणे यांनी गप्पा मारण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी आणि राजकीय दहशतवादाविरोधात मी जसा राजीरामा दिला, तसा राजीनामा देऊन दाखवावा. आज माझा वाढदिवस असल्याने मी कोणावर टीका करणार नाही. परंतु जिल्ह्यात झाड जरी कोसळले तरी ते पालकमंत्री केसरकरांमुळे पडले, अशी टीका राणेंकडून केली जाते. त्यांच्या काळात जिल्ह्यात सर्वच रस्त्यांची खराब कामे झाली आहेत.’’

या वेळी श्री. केसरकर म्हणाले, ‘‘ओरोस येथे मंजूर असलेल्या बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचे काम येत्या दोन महिन्यांत मार्गी लागणार आहे.

त्यासाठी आज बैठक घेतली. कोंडुरा येथील अपंग मुलासमवेत अणाव आणि पणदूर येथील आश्रमांना भेटी दिल्या. दरवर्षी आपण वाढदिवस साजरा करीत नाही; परंतु यावर्षी कार्यकर्त्यांकडून आग्रह करण्यात आल्याने हा निर्णय घेतला होता. जिल्ह्याचा विकास होण्यासाठी मी कायम झटणार आहे.

ज्याप्रमाणे शिक्षणात जिल्ह्याचा वेगळा पॅटर्न तयार झाला, त्याचप्रमाणे येथील जिल्ह्याच्या विकास दराच्या तुलनेत वेगळा पॅटर्न तयार करण्याच्या उद्देशाने माझे काम सुरू आहे. त्याला नक्कीच येथील जनता पाठिंबा देईल.’’
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. या वेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आमदार वैभव नाईक, माजी आमदार पुष्पसेन सावंत, नगराध्यक्ष बबन साळगावकर, महेश कांदळगावकर, तालुका संपर्क प्रमुख राजू नाईक, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, प्रकाश परब, युवा सेना तालुकाधिकारी सागर नाणोसकर, संजय पडते, तेजस परब, नगरसेविका आनारोजीन लोबो, भारती मोरे, सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, गणेशप्रसाद गवस, अशोक दळवी, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, दीपाली सावंत, शब्बीर मणियार, अर्पणा कोठावळे, श्रृतीका दळवी, शिवानी पाटकर, श्रीकांत घाग, मायकल डिसोझा, फॅन्की डान्टस, हर्षद बेग, सुभाष गोवेकर, रफीक मेमन, नितीन वाळके, जयदेव गवस, तेजस परब, हर्षद चव्हाण आदी उपस्थित होते.

आता हत्ती हटाव मोहीम पुन्हा नाही
या वेळी श्री. केसरकर पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात हत्तीचे संकट असले तरी यापुढे हत्ती हटाव मोहीम राबविली जाणार नाही. तिलारीच्या पलीकडील जंगलमय भागात त्याचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. अन्य वन्य प्राण्यांप्रमाणे त्यांनाही सुरक्षा देण्यात येणार आहे; मात्र ते वस्तीत येऊ नयेत, यासाठी त्यांच्या येण्याच्या ठिकाणी खंदक खोदण्यात येणार असून कर्नाटकच्या सीमेवर मोठी भिंत घालण्यात येणार आहे. यासाठी २३ लाख रुपयांची तरतूद केली आहे.’’

बांद्यात मिळणार अडीचशे जणांना रोजगार
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘बांदा-वाफोली येथे सुरू असलेल्या जेसीबीच्या कारखान्याचे दुसरे युनिट सुरू करण्यात येणार आहे. त्याठिकाणी इन्व्हर्टर आणि जनरेटरचा कारखाना सुरू करण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात हा कारखाना सुरू करण्यात येणार असून त्या माध्यमातून अडीचशेहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे.’’