राणेंनी आपला पक्ष काढावा असे आव्हान दीपक केसरकरांनी केले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

सावंतवाडी - इनकमटॅक्स कार्यालयात शिपाई म्हणून काम करणार्‍या नारायण राणे यांची अंबानीच्या खालोखाल संपत्ती कशी काय आली. त्यांनी इतकी माया कशी काय गोळा केली. याचे उत्तर द्यावे आणि नंतरच माझ्यावर टिका करावी, असा आरोप आज येथे पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला.

दरम्यान आपल्याकडे इतके आमदार आहेत तितके आमदार आहेत, अशा वल्गना करीत बसण्यापेक्षा राणेंनी आपला पक्ष काढावा आणि आपला मुलगा आमदार नीतेश याला पुन्हा निवडून आणावे, असे ही त्यांनी यावेळी श्री. राणे यांना आव्हान दिले.

सावंतवाडी - इनकमटॅक्स कार्यालयात शिपाई म्हणून काम करणार्‍या नारायण राणे यांची अंबानीच्या खालोखाल संपत्ती कशी काय आली. त्यांनी इतकी माया कशी काय गोळा केली. याचे उत्तर द्यावे आणि नंतरच माझ्यावर टिका करावी, असा आरोप आज येथे पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला.

दरम्यान आपल्याकडे इतके आमदार आहेत तितके आमदार आहेत, अशा वल्गना करीत बसण्यापेक्षा राणेंनी आपला पक्ष काढावा आणि आपला मुलगा आमदार नीतेश याला पुन्हा निवडून आणावे, असे ही त्यांनी यावेळी श्री. राणे यांना आव्हान दिले.

श्री. केसरकर यांच्यासह शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हे हफ्ते घेत आहेत आणि त्यांच्या विरोधात आपण लवकरच अ‍ॅफीडेव्हीट घालणार आहे, असा आरोप राणेंनी आपल्या पत्रकार परिषदेत केला होता. या टिकेला श्री. केसरकर यांनी प्रत्यूत्तर दिले. ते म्हणाले, “आम्ही पुर्वीपासुन सावंतवाडीतील शेठ घराणे आहोत; मात्र जे राणे इनकटॅक्स कार्यालयात साधे शिपाई होते. त्यानंतर दहावीची परिक्षा देवून क्लार्क झाले. अशा राणेंकडे इतकी संपत्ती कोठुन आली. सद्यस्थिती लक्षात घेता अंबानीच्या संपत्तीनंतर त्यांचा दुसरा नंबर लागत आहे ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. आम्हाला ठेकेदारांकडे जाण्याची गरज नाही जे ठेकेदार आहेत ते तुमचेच आहेत. त्यामुळे तुम्ही सांगितल्यानंतर ते खोटी अ‍ॅफीडेव्हीट घालू शकतात. त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य नाही.”

श्री. केसरकर पुढे म्हणाले, “राणे भाजपात जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत; मात्र त्यासाठी आपल्या संपर्कात शिवसेनेचे 27 आमदार आहेत, इतके खासदार आहेत, असे सांगत आहेत; मात्र त्यांनी अशा प्रकारच्या वल्गना करण्यापेक्षा इतके आमदार सोबत आहेत तर थेट दुसराच पक्ष काढावा आणि विशेष म्हणजे त्या पक्षाच्या कींवा पॅनलच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना निवडणून आणून दाखवावे. केवळ वल्गना करण्यार्‍या राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला नाही ? याचे उत्तर त्यांनी द्यावे. हींमत असेल तर आमदार राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून पुन्हा निवडून यावे.”

श्री. केसरकर पुढे म्हणाले, “राणेंना भाजपात जायचे आहे; मात्र भाजपा चांगल्या आणि सुसंस्कृत लोकांचा पक्ष आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ते नक्कीच थारा देणार नाहीत, असा मला विश्‍वास आहे. राणेंची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी आहे. कणकवलीत घडलेल्या खून प्रकरणात राणे थेट आरोपी होते. त्यात कोणी अपिल केले नाही म्हणून ही वस्तूस्थिती आहे. तर शिवराम दळवी यांच्या हॉटेल जेआरडीवर सह त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला केला होता. उमेश कोरगावकर यांचे हात पाय फॅक्चर ठेवण्यात आले होते. हा त्यांचा इतिहास आहे. हे सर्व जनता विसरलेली नाही. त्यामुळे त्यांना पक्षात घेण्याआधी नक्कीच भाजपाकडुन विचार मंथन होणे गरजेचे आहे.”

नुसते माझ्याकडे पैसे आहेत आणि इतके आमदार आहेत, असे त्यांनी सांगितल्यामुळे भाजपा त्यांना निश्‍चितच प्रवेश देणार नाही, असा माझा विश्‍वास आहे, असे सांगुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राणेंबाबत मांडलेल्या भूमिका योग्यच आहे, असेही त्यांनी सांगितले.

पैसा हे क्लालीफीकेशन नाही.
यावेळी श्री. केसरकर म्हणाले, “राणें आपल्याकडे इतके आमदार आहेत, इतका पैसा आहे, असे सांगुन आपला दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र जिल्ह्यातील जनतेने त्यांच्या प्रवृत्तीला यापुर्वीच नाकारले आहेत. त्यामुळे पैसा हे त्यांचे क्लालीफीकेशन होवू शकत नाही.”

तर महाराष्ट्र पिंजून काढेन
राणें सारख्या गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीला सत्ताधारी भाजपात थारा देवू नये, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आपण महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. काल (ता.23) औरंगाबाद, जालना येथून आपण सुरवात केली आहे. त्यांच्या प्रवृत्तीच्या विरोधात माझी कायम लढाई सुरू असणार आहे, असेही केसरकर म्हणाले.