जुन्या पोलिस ठाण्याच्या इमारतीत म्युझियमसाठी प्रयत्न करणार - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - येथील जुन्या पोलिस ठाण्याची वास्तू ऐतिहासिक आहेत. यामुळे हेरिटेजच्या धर्तीवर या वास्तूचे जतन करून त्याठिकाणी म्युझियम उभारता येऊ शकते का? यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सावंतवाडी - येथील जुन्या पोलिस ठाण्याची वास्तू ऐतिहासिक आहेत. यामुळे हेरिटेजच्या धर्तीवर या वास्तूचे जतन करून त्याठिकाणी म्युझियम उभारता येऊ शकते का? यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सावंतवाडीच्या नवीन पोलिस ठाण्याचे उद्‌घाटन श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जुन्या पोलिस ठाणे पाडून त्या ठिकाणी अन्य काही उभारले जात असेल, तर चुकीचे आहे त्या इमारतीचे जतन व्हावे, अशी मागणी केली होती त्या ठिकाणी पेट्रोलपंप प्रस्तावित आहे; मात्र त्यासाठी विरोध आहे याबाबत ‘सकाळ’ने उद्‌घाटनाच्या दिवशी वृत्त प्रसिद्ध केले होते या वेळी या विषयावर चर्चा झाली.

सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन केल्यानंतर महिलांसासाठी जागृती नावाचे पुस्तक प्रकाशन करण्यात आले. या वेळी राज्याचे पालकमंत्री श्री. केसरकर बोलत होते. या वेळी आमदार निलम गोऱ्हे, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्‍मा सावंत, नगराध्यक्ष बबन साळगावकर, सभापती रविंद्र मडगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीपकुमार गेडाम, उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, दयानंद गवस, पद्मजा चव्हाण, सुमती गावडे, जान्हवी सावंत आदी उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, ‘‘सावंतवाडी माझी जन्मभूमी आहे. राजकीय कारकीर्द येथूनच सुरू झाली आहे. यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन अवैध धंदे बंद करावेत. दारूच्या गोळा होणाऱ्या बाटल्या लक्षात घेता शुन्यावर यायला हवे तरच अभिमानाने सांगता येईल.’’

जागृती पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी आमदार गोऱ्हे म्हणाल्या,‘‘दिल्लीच्या निर्भया केसनंतर देशभरात महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत; पण सिंधुदुर्गात हे प्रमाण कमी आहे. स्त्री भ्रूण हत्या कमी होत्या तसेच मुलींचा जन्मदरदेखील अत्यप असल्याचे त्यांनी सांगून महिला सोबतच पुरुषातदेखील जागृती व्हायला हवी.’’

पोलिस अधीक्षक दीिक्षतकुमार गेडाम म्हणाले,‘‘सावंतवाडी पोलिस ठाण्याची इमारत १८९९ ची आहे. आता ११७ वर्षानंतर नवीन इमारत मिळाली.
 महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. अवैध धंदे निदर्शनास आणल्यास कारवाई करेन.’’ प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार सतीश कदम, कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे, अशोक दळवी, राजू नाईक, रुपेश राऊळ उपस्थित होते. प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले.

शासनाने अत्याचारित मुलीला १० लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे, पण अत्याचार होणार नाहीत म्हणून खबरदारी घेतली जावी. जागृती हे पुस्तक स्त्रियांना कायद्याच्या माहितीसाठी उपयुक्त ठरणार असून, राज्यात दिशादर्शक ठरेल. पुन्हा वाईट प्रसंग घडणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.
- दीपक केसरकर, पालकमंत्री