विकास आराखड्याच्या त्रुटी मांडल्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

सावंतवाडीत नगररचनाकारांसमोर सुनावणी; आराखडाबाधितांसह स्वराज्यकडून निवेदन

सावंतवाडी - येथील पालिकेच्या शहर विकास आराखड्याच्या सूचना, हरकतीवर आज सुनावणीदरम्यान नगररचनाकार सुरेश सुर्वे यांच्याकडे यात जमीनबाधित झालेले भूमिपुत्र व स्वराज्य संघटनेमार्फत निवेदन देऊन हरकती नोंदविल्या. यावर या आराखड्यातील असलेल्या तांत्रिकदृष्ट्या त्रुटी आठ दिवसांत समितीकडे सादर करण्याचे सुर्वे यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाद्वारे शहराच्या विकास आराखड्यावर आज बॅ. नाथ पै सभागृहात हरकतीवर आज सुनावणी झाली. शहर विकास आराखडा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने बनविलेला असल्याचा आक्षेप घेत स्वराज्य संघटनेचे आराखड्यातील त्रुटींबाबतचे निवेदन घेऊन सभागृहात दाखल झाले. यावेळी आराखड्याने बाधित नागरिकही होते.

शहर विकास आराखड्याबाबत नगराध्यक्षांची भेट घेतली असता त्यांनी नागरिक व स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना तुमच्या मागण्या समितीसमोर मांडाव्यात, असे सांगितले होते. त्यानुसार आज नागरिक व स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगररचनाकार उपसंचालक सुर्वे यांच्याशी चर्चा केली. यावेळी आराखड्यातील भूखंड हे पायाभूत नागरिक सुविधेसाठी आरक्षित असतात. असे असतानाही पूर्णतः चुकीचा आराखडा बनविला आहे. शहरात इमारतीसाठी पार्किंगची व्यवस्थित सोयही नाही. प्रकल्प हे भाडेतत्त्वावर देण्यात येतात. शहरातील काही लोकांच्या फायद्याचा विचार करुन हा शहर विकास आराखडा बनविल्याचा आरोप यावेळी स्वराज्य संघटनेमार्फत करण्यात आला. यावेळी शहर आराखड्यामधील त्रुटी ८ दिवसांत समितीकडे द्याव्यात. त्यानंतर पुढील बाबीचा तांत्रिकदृष्ट्या विचार करण्यात येईल, असे श्री. सुर्वे यांनी सांगितले. यावर ज्यांना शहरविकास आराखड्याबद्दल हरकत असून जे भूखंडबाधित आहेत अशा नागरिकांची स्वराज्य संघटना व भूखंडबाधित नागरिकांची संयुक्तिक बैठक घेण्यात येणार आहे. ज्यांच्या जागा आरक्षित झाल्या आहेत त्याच्या पाठीशी आपण राहणार आहे. शहर विकास आराखड्याला विरोध असून तो पुन्हा करण्याविषयी भाग पाडण्यात येईल, असे स्वराज्य संघटनेच्या राजू कासकर यांनी सांगितले. यावेळी अमोल साटेलकर, श्रीपाद सावंत, सुनील पेडणेकर, संजू निपाणीकर, बाबू चलम व शहरातील काही नागरिक उपस्थित होते.