१३ वर्षे निर्लेखन रखडलेल्या शाळेची गोष्ट...

दांडेली - येथील १३ वर्षांपासून धोकादायक स्थितीत उभी असलेली इमारत.
दांडेली - येथील १३ वर्षांपासून धोकादायक स्थितीत उभी असलेली इमारत.

दांडेलीतील प्रकार - धोकादायक इमारतीमुळे २८ मुलांवर टांगती तलवार
सावंतवाडी - फेरलिलावाचा पत्ता नाही, इमारत केव्हा कोसळेल याचा नेम नाही. इमारतीच्या एका बाजूला प्राथमिक शाळा तर दुसऱ्या बाजूला अगदी लागूनच अंगणवाडी. मधोमध १३ वर्षांपूर्वीची कोसळण्याच्या स्थितीतील इमारतीमुळे अनामत रकमेच्या पावतीअभावी २८ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. दांडेली जिल्हा परिषद शाळेच्या धोकादायक इमारतीचा हा निर्लेखन प्रश्‍न सुटणार केव्हा, असा सवाल येथील ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.

दांडेलीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारत बांधणीला २००३ च्या प्रस्तावाअर्तंगत मंजुरी दिली. यावेळी आरोस बाजार येथील चंद्रशेखर मालवणकर यांनी जुन्या इमारतीतच्या लिलावातून ही इमारत आपल्या ताब्यात घेतली. निर्लेखित इमारतीच्या जागेतच नवीन इमारत बांधणे आवश्‍यक असतानाही बाजूलाच २००६ ला नवीन इमारत बांधण्यात आली.

त्या इमारतीला दोन वर्षातच गळती लागली हा भाग वेगळाच; मात्र १३ वर्षापूर्वीच निर्लेखित करण्यात आलेली अत्यंत धोकादायक इमारत मात्र हटविण्याची कार्यवाही अधांतरीच राहिली. ही इमारत त्यावेळी ३६ हजार रुपयांना लिलावास काढली. मात्र इमारतीच्या लिलाव प्रक्रियेसाठी देण्यात येणारी अनामत १० टक्केच म्हणजेच ३६०० एवढी रक्कम भरली, असे माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सखाराम गावडे यांनी सांगितले.

अनामत रक्कम भरण्याची कार्यवाही करणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले. यात त्यांनी भरलेल्या अनामत रकमेची पावती मात्र कोणाच्याच हाती लागली नाही. पावसाळ्यात ही इमारत केव्हाही कोसळू शकते. यासाठी तत्कालीन शाळा व्यवस्थापन समितीने पाठपुरावा सुरु केला. याबाबतची कल्पना त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिली. यावेळी त्यांनी फेरलिलाव करण्याची कल्पना सुचविली. फेरलिलावासाठी जुन्या अनामत रकमेची पावती आवश्‍यक असल्याने समितीने निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडे हा विषय नेवून त्यांनी आपण भरलेली रक्कम आपल्याला मिळावी, अशी मागणी केली. 

भरलेल्या रकमेची पावती निधनापूर्वी गहाळ झाली असल्याची माहिती समोर आली. दरम्यान बांधकाम विभागाकडे याची शोधाशोध केली असता पावतीचा उताराही बांधकाम विभागाकडे नसल्याचे समोर आले. निर्लेखित इमारत लवकरात लवकर हटविली जावी यासाठी शाळा व्यवस्थापन सामितीकडून सतत पाठपुरावा करण्यात आला. यावर शिक्षण विभागाने शाळेचा फेरलिलावाचा प्रश्‍न मार्गी लावणे आवश्‍यक असल्याने आपण काहीच करू शकत नसल्याचा निर्वाळा दिला. बांधकामच्या याबाबतच्या कार्यवाही बाबत शाळा व्यवस्थापन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. आज याचा फटका येथे अंगणवाडी व प्राथमिक शाळेला बसत आहे. दोन वर्षापासून कोसळण्यास सुरवात झालेल्या इमारतीची सद्यस्थिती खूपच गंभीर आहे.

नवीन प्राथमिक व अंगणवाडीच्या अगदी जवळ मधोमध असणाऱ्या इमारती जवळ मूले न जाण्यासाठी शिक्षकांना डोळ्यात तेल घालून राहण्याची वेळ येत आहे. फेरलिलाव होण्याचा मार्ग मोकळा झाल्यास विद्यार्थ्यांना असलेला मोठा धोका टळू शकतो. मात्र यावर नेमका उपाय शोधण्यास सर्वच असमर्थ असल्याची परिस्थिती आहे. स्वत ः इमारत हटविल्यास लिलाव रकमेसंदर्भात मोठ्या समस्या निर्माण होवू शकतात, अशी शक्‍यता शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सदस्य सखाराम गावडे यांनी व्यक्त केली. समितीचे अध्यक्ष सतिश बिरोडकर, प्रमोद पांगम, रमेश गावडे, सतिश मोरजकर, सुभाष मोरजकर, सखाराम गावडे तर लिलावाची अनामत रक्कम भरणाऱ्याच्या वारसदारच्या पत्नी यांनी आपण भरलेली रक्कम प्रथम मिळावी. त्यांनतर फेरलिलावास आपण हरकत राहणार नसल्याचे संमती पत्र लिहून देते असे सांगितले. यासर्व गर्तेत मात्र प्राथमिक शाळेतील १७ आणि अंगणवाडीतील ११ अशा २८ मुलांचा जीव टांगणीला लागलेला आहे. कोणाजवळ या समस्येचे अपेक्षित उत्तर नसल्यामुळे याप्रकरणी प्रश्‍नचिन्ह कायम आहे.

अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेच्या मधोमध असलेली ही इमारतीमुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घवून वावरावे लागत आहे. शाळा व्यवस्थापन समिती याबाबत पाठपुरावा करत असून अपेक्षित सहाय्य फार दुर आहे. उद्या कोणतीही घटना घडल्यास त्याला जबाबदार बांधकाम विभाग राहणार काय?
- सखाराम गावडे, माजी अध्यक्ष-शाळा व्यवस्थापन समिती

पालकांमध्ये संताप
जिल्ह्यातील पहिली व राज्यातील दुसरी मोबाईल डिजिटल शाळा ठरलेल्या या शाळेच्या निर्लेखनाबाबत कोणत्याच लोकप्रतिनिधीने लक्ष घातले नसल्यामुळे पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त वर्तविण्यात येत आहे. निवडणुका होऊनही कधी त्यांची फेरीही दिसली नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com