भाजपात वाढीपेक्षा अंतर्गत वादाचा खळखळाट जास्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

जिल्ह्यात अंतर्गत बंडाळी - निम्मा सत्ताकाळ संपत आला तरी अपेक्षित उंची नाही, राणेंचा भाजप प्रवेश झाला तर..
सावंतवाडी - भाजप सत्तेत आल्यावर सिंधुदुर्गात जोमाने वाढेल असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा होरा होता. सत्तेचा सुगंध दरवळताच इतर पक्षातील काही बडे नेतेही भाजपात डेरेदाखल झाले; पण केंद्र आणि राज्यातील निम्मा सत्ताकाळ संपत आला तरी भाजपला अपेक्षित उंची गाठता आलेली नाही.

जिल्ह्यात अंतर्गत बंडाळी - निम्मा सत्ताकाळ संपत आला तरी अपेक्षित उंची नाही, राणेंचा भाजप प्रवेश झाला तर..
सावंतवाडी - भाजप सत्तेत आल्यावर सिंधुदुर्गात जोमाने वाढेल असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा होरा होता. सत्तेचा सुगंध दरवळताच इतर पक्षातील काही बडे नेतेही भाजपात डेरेदाखल झाले; पण केंद्र आणि राज्यातील निम्मा सत्ताकाळ संपत आला तरी भाजपला अपेक्षित उंची गाठता आलेली नाही.

पक्षातील अंतर्गत असंतोषाचा खळखळाट मात्र पक्षाच्या वाढीपेक्षा कित्येक पटीने वाढला आहे. आता तर सत्तेत नसूनही जिल्ह्यातील सर्वाधिक वजनदार नेतृत्व असलेल्या नारायण राणेंच्या कथीत प्रवेशाची चर्चा सुरू आहे. तसे झाले तर भाजप किती वाढेल यापेक्षा नव्या अंतर्गत संघर्षाला धुमारे फुटण्याची शक्‍यता जास्त आहे.

भाजप राष्ट्रीय पक्ष असला तरी कोकणात कित्येक वर्षे अस्तित्व असूनही त्यांना ते दाखवता आले नाही. बराच काळ शिवसेनेसोबत त्यांनी सत्ता उपभोगली. मात्र पक्ष म्हणून स्वतंत्रपणे ताकद निर्माण करता आली नाही. भाजपकडे कार्यकर्त्यांची फळी ठराविक पठडीतली राहिली. आक्रमकपणे सत्ता मिळविण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. गुहागर, देवगड अशा काही भागांत भाजपने सत्तास्थाने राखली. मात्र त्यात पक्षापेक्षा तिथल्या नेतृत्वाची पुण्याईच जास्त प्रभावी ठरली.

साधारण अडीच वर्षापूर्वी सत्तेचे वारे भाजपच्या बाजूने वाहू लागल्यापासून देशभर शतप्रतिशत भाजपचा नारा दिला गेला. यातच शिवसेना आणि भाजप दुरावले. त्यामुळे कोकणातही भाजपला स्वतंत्र अस्तित्वाची गरज जाणवू लागली. गेल्या विधानसभा निवडणुकीत काही मतदार संघात भाजपला उमेदवार शोधण्याची वेळ आली होती. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने इतर भागाप्रमाणे कोकणातही भाजप वाढेल, अशी शक्‍यता होती. पण आतापर्यंत त्याची फलश्रुती फारशी प्रभावीपणे दिसलेली नाही. भाजपनेही कार्यकर्त्यांचे बळ वाढविण्यापेक्षा येईल तो वजनदार नेता कमळाच्या छायेखाली आणण्याचा सपाटा लावला. यामुळे काही प्रमाणात भाजपची हवा निर्माण झाली. त्यावर आरुढ होऊन काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा मिळविण्यात यशही आले. पण नेते वाढण्याबरोबरच त्यांच्या अपेक्षा, अंतर्गत स्पर्धा यातही वाढली. अंतर्गत खदखद या आधी अदृष्यपणे वावरत होती. मात्र मालवणमध्ये तालुकाध्यक्ष पदावरून झालेल्या वादानंतर ती चव्हाट्यावर आली. तेथे थेट जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनाच टिकेचे लक्ष केले गेले. जठार, माजी आमदार राजन तेली, युवा नेते संदेश पारकर, अतुल काळसेकर आदी भाजपमधील बडे नेते जिल्ह्यात संघटना वाढीसाठी आपापल्या पातळीवर ताकद लावत आहेत. पण अपेक्षेइतकी संघटना फोफावलेली नाही. उलट पदाधिकाऱ्यांना आहे तशी स्थिती राखण्यात रस आहे की काय अशी शंका घ्यायला वाव आहे. नेते बड्याबड्या प्रकल्पांचा हवाला देत विकासाच्या वल्भना करत आहेत. मात्र सर्वसामान्यांचे प्रश्‍न आहे तिथेच आहेत. त्यामुळे या घोषणांचा संघटना वाढीसाठी फारसा प्रभाव होत असल्याचे दिसत नाही. उलट अंतर्गत स्पर्धा मात्र तीव्र आहे. शिवाय प्रत्येक नेता आपल्या भागात प्रस्थापित बनल्याने कोणी संघटना वाढवायची, कोणाला दोष द्यायचा आणि कोणाचे कौतुक करायचे असा प्रश्‍न आहे.
यातच भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री राणे डेरेदाखल होतील, अशी चर्चा गेले काही महिने प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे. त्यांच्या कथीत प्रवेशाआधीच भाजपच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी विरोधाचा सूर आळवायला सुरवात केली आहे. राणे आलेच तर पुन्हा एकदा नव्या-जुन्या वादाचा सूर ऐकायला मिळेल, अशी शंका घ्यायला वाव आहे. एकूणच भाजप वाढीपेक्षा अंतर्गत वादाचा खळखळाट जास्त असल्याचे चित्र आहे.

नेत्यांमधील हेवेदावे, लोकांशी जवळीकीचा अभाव, हाय प्रोफाईल संघटन वाढीचे प्रयत्न आणि याच्या जोडीला नव्याने येऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी व इतर लोकांचा विरोध असलेल्या प्रकल्पांचे समर्थन याचा विचार केला तर भविष्यात भाजप किती वाढेल हाही प्रश्‍न आहे. एकूणच जिल्ह्यासह कोकणात कमळ खुलायला अजूनही मर्यादा कायम आहेत. 
 

मच्छीमार राजकारणाच्या केंद्रस्थानी
पूर्वी कोकणातील राजकारण शेतकरी, बागायतदार यांच्या भोवती फिरायचे. या घटकांसाठी मृदा संवर्धन, फलोत्पादन अशा महत्त्वाकांक्षी योजना आणून काँग्रेसने कोकणात समाजवादी पक्षाला धक्का देत आपली पाळेमुळे घट्ट केली होती. अलीकडे शेतकऱ्यांपेक्षा मच्छीमार हा घटक राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. सधन असलेला पर्ससीननेट मच्छीमार आणि बहुसंख्येने असलेला पारंपरिक मच्छीमार अशा दोन गटांभोवती राजकारण फिरताना दिसत आहे. शिवसेनेने पारंपरिक मच्छीमारांची बाजू घेत सत्तेसाठी जमेचे राजकारण केले. अलीकडे जिल्हा भाजपने पर्ससीनचा पुरस्कार करून पारंपरिक मच्छीमारांचा रोष ओढवून घेतला. हे राजकारण भाजपला कोणत्या वळणावर नेते हे येणाऱ्या निवडणुकांमध्येच ठरणार आहे.