सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांचा व्याप वाढणार

सावंतवाडी - येथील लाकडी खेळण्यांचे संग्रहित छायाचित्र.
सावंतवाडी - येथील लाकडी खेळण्यांचे संग्रहित छायाचित्र.

सावंतवाडी - येथील लाकडी खेळण्यांना भौगोलिक चिन्हांकन (जीआय) मिळवून ग्लोबल मार्केट खुले करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत; मात्र ही वैशिष्ट्यपूर्ण कला छोट्या बाजारपेठेमुळे मर्यादित राहिली आहे. जागतिक बाजारपेठ खुली झाली तरी या कलेच्या विस्तारासाठी खूप काम करावे लागणार आहे.

लाकडी खेळणी ही सावंतवाडीची ओळख मानली जाते. सावंतवाडी संस्थानकडून मिळालेल्या राजाश्रयामुळे ही कला येथे खुलत गेली; मात्र मधल्या काळात कारागिरांची वानवा, मर्यादित बाजारपेठ आदी कारणांमुळे ही कला लुप्त होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. 

पुन्हा एकदा सावंतवाडी संस्थानच्या प्रयत्नांमुळे कला पुनर्जिवीत झाली. संस्थानचे तत्कालीन राजे (कै.) शिवरामराजे भोसले आणि विद्यमान राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी या कलेच्या ऊर्जितावस्थेसाठी खूप प्रयत्न केले. आता सावंतवाडीत लाकडी खेळण्यांची छोटी बाजारपेठ विकसित झाली आहे; मात्र मध्यंतरी मुंबई-गोवा महामार्ग शहराबाहेरून गेल्याने येथील बाजारपेठेवर मंदीचे सावट पसरले. आता केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी लाकडी खेळण्यांना जीआय मानांकन मिळवून जागतिक बाजारपेठ खुली करण्याचे प्रयत्न सुरू केल्याने ही कला पुन्हा एकदा बदलाच्या मार्गावर आहे.

केंद्रीय वाणिज्य विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची नुकतीच जिल्हा प्रशासनासोबत बैठक झाली. यात हापूस व इतर गोष्टींबरोबरच लाकडी खेळण्यांना जीआय मानांकन मिळविण्याबाबत नियोजन करण्यात आले. याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. हे मानांकन मिळाल्यानंतर वाणिज्य विभागाच्या ई-कॉमर्स या पोर्टलवर ही खेळणी विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. यामुळे जागतिक बाजारपेठ खुली होईल.

ही प्रक्रिया सुरु असलीतरी लाकडी खेळण्यांच्या बाजारपेठेची स्थिती वेगळी आहे. ही कला फार विस्तारलेली नाही. शहरात अशा खेळण्यांच्या विक्रीचे सात ते आठ दुकानेच आहेत. ठराविक घराणीच या व्यवसायात आहेत. त्यांना कुशल कारागिरांची खूप मोठी अडचण जाणवत आहे. सध्या ही खेळणी बनविणारे बहुसंख्य कारागीर जुन्या पिढीतील आहेत. काही वर्षांनी ही खेळणी बनवायला कुशल कारागिरांची मोठी वानवा भासेल अशी भीती लाकडी खेळणी व्यावसायिकांना वाटत आहे.

याबाबत लाकडी खेळण्यांचे व्यवसायिक राजेश काणेकर म्हणाले,‘‘महामार्ग बाहेरुन गेल्याने येथील व्यवसायावर परिणाम झाला आहे; मात्र सावंतवाडीतून खरेदी करुन मालवण, आंबोली आदी जिल्ह्याच्या इतर भागात या खेळण्यांची विक्री केली जाते. जागतिक बाजारपेठ खुली झाली तरी डिमांड पूर्ण करण्यासाठी या व्यवसायाला आणखी व्यापक रुप द्यावे लागणार आहे; मात्र कुशल कारागीर मिळत नसल्याने यालाही मर्यादा आहेत.’’

असे असलेतरी या क्षेत्राबाबतच्या अभ्यासकांचे मत वेगळे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मागणी वाढल्यावर यातील संधी वाढतील. त्यामुळे लाकडी खेळण्यांच्या व्यवसायाचा आणखी विस्तार होईल. ग्रामीण विकास व रोजगार क्षेत्रातील अभ्यासक योगेश प्रभू याबाबत म्हणाले, ‘‘सध्या मर्यादीत मार्केटमुळे लाकडी खेळण्यांकडे व्यवसाय म्हणून पाहणाऱ्यांची संख्या मर्यादीत आहे. जागतिक बाजारपेठ मिळाल्यास यातील संधी वाढतील.

त्यामुळे या क्षेत्रात उतरणाऱ्यांची संख्याही वाढेल. यातून लाकडी खेळण्यांच्या व्यवसायाचा विस्तार होईल. जीआय मानांकन मिळाल्यास याचे ड्युप्लीकेशन करता येणार नाही. त्यामुळे सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांची ओळख अधिक भक्कम होईल.’’

दृष्टिक्षेपात...
सतराव्या-अठराव्या शतकादरम्यान सावंतवाडीत लाकडी खेळण्यांच्या कलेची सुरुवात
लाखकाम या नावाने परिचय
संस्थानचे राजे खेमसावंत तिसरे यांच्याकडून राजाश्रय
१९३० च्या दरम्यान पुण्यश्‍लोक बापूसाहेब महाराजांच्या प्रयत्नाने या कलेचे पुनरुज्जीवन
मूळ आंध्र, तेलंगणातील कलावंतांकडून निर्मिती
१९५९ च्या दरम्यान श्रीमंत शिवरामराजे भोसले व राजमाता सत्वशीलादेवी भोसलेंकडून या कलेस गतवैभव देण्यासाठी ठोस प्रयत्न
१९७३ मध्ये सावंतवाडी लॅक्‍स वेअर्स संस्थेची स्थापना
राजेसाहेब, राजमातांच्या प्रयत्नाने जर्मनी, जपानमध्ये कलेचा प्रसार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com