पालकमंत्री एटीएममध्ये दाखल होतात तेव्हा...

अमोल टेंबकर
शुक्रवार, 26 मे 2017

सावंतवाडी - मंत्री म्हटला की लवाजमा आला, प्रोटोकॉल आला आणि त्याच बरोबर अधिकार आले. पण या सर्व बढायांना बाजूला सारून सिंधुदुर्गच्या पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्र्यांनी राज्यात एक आपली ओळख निर्माण केली आहे. यासाठी स्वकीयांसोबत अन्य विरोधकांच्यासुद्धा त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले आहे; परंतु या सर्व टीकाटिप्पणीला बाजूला सारून दीपक केसरकर यांनी मंत्रिपदानंतरसुद्धा आपले पाय जमिनीवरच ठेवले आहेत. याचा आणखी एक प्रत्यय सावंतवाडीकरांना काल (ता. २४) पाहायला मिळाला.

सावंतवाडी - मंत्री म्हटला की लवाजमा आला, प्रोटोकॉल आला आणि त्याच बरोबर अधिकार आले. पण या सर्व बढायांना बाजूला सारून सिंधुदुर्गच्या पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्र्यांनी राज्यात एक आपली ओळख निर्माण केली आहे. यासाठी स्वकीयांसोबत अन्य विरोधकांच्यासुद्धा त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले आहे; परंतु या सर्व टीकाटिप्पणीला बाजूला सारून दीपक केसरकर यांनी मंत्रिपदानंतरसुद्धा आपले पाय जमिनीवरच ठेवले आहेत. याचा आणखी एक प्रत्यय सावंतवाडीकरांना काल (ता. २४) पाहायला मिळाला. पैसे काढण्यासाठी रात्री साडेअकरा वाजता ते स्वत: एटीएममध्ये गेल्याने तो येथे चर्चेचा विषय ठरला. मंत्र्याला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

सावंतवाडीचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री केसरकर यांची वागणूक आणि सर्वसामान्य माणसाबद्दल असलेली तत्परता याचा अनेकांना प्रत्यय आला असेल. ते सर्वच लोकांशी अती सौजन्याने वागतात. काही गोष्टीत  तर अधिकाऱ्यांनाही जास्त ‘रिस्पेक्‍ट’ देतात. अशा स्वभावावरून त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे 
जावे लागते आणि आत्तासुद्धा जावे लागत आहे; मात्र अशा परिस्थितीही एक सर्वसामान्यातला आगळा-वेगळा माणूस म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्याचा प्रत्यय काल (ता. २४) रात्री बसस्थानकाच्या परिसरात असलेल्या नागरिकांना आला. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नेहमीचा दौरा आटोपून श्री. केसरकर आपल्या घरी येण्यास निघाले; मात्र खिशातील पैसे संपले असल्याचे लक्षात येताच त्यांनी आपली गाडी बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या स्टेट बॅंक एटीएम केंद्राकडे वळविली. आणि चक्क स्वत: गाडीतून उतरून त्यांनी एटीएममध्ये प्रवेश केला. राज्यमंत्री एटीएमकडे येत आहेत हे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी असलेला सिक्‍युरिटी गार्डसुद्धा गोंधळला; मात्र केसरकर यांनी नेहमीच्या स्टाईलने त्याला सुद्धा नमस्कार करीत एटीएममध्ये प्रवेश केला. तब्बल दहा ते पंधरा मिनिटांनी ते बाहेर आले. तो पर्यंत त्यांच्या लवाजम्यासह त्यांचे सहकारी स्वीय सहायक आणि त्यांची लाल दिवा नसलेली गाडी त्या ठिकाणी होती. काही वेळाने श्री. केसरकर रक्कम काढून 
निघून गेले. त्यांचा हा सर्व प्रवास अनेकांनी थांबून पाहिला. काहींनी तर केसरकर यांच्या या स्वभावाबद्दल समाधानसुद्धा व्यक्त केले. ह्या सर्व प्रकाराबाबत श्री. केसरकर अज्ञात असतील; मात्र त्यांच्या या साध्या वागण्यामुळे केसरकर हे मंत्री झाल्यानंतरसुद्धा सर्वसामान्यच राहिले असून त्यांचे पाय अद्याप पर्यत जमिनीवरच असल्याचे अनेकांकडून मत व्यक्त करण्यात आले.