राणे यांची पार्श्‍वभूमी भाजपने तपासावी - केसरकर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - नारायण राणेंचा भाजप प्रवेश म्हणजे चित्रपटाच्या वेगवेगळ्या जाहिराती आहेत. त्यांच्याविषयी न बोललेलेच बरे; मात्र त्यांना मंत्रिपद देण्यापूर्वी भाजपने त्यांचा पूर्व इतिहास तपासावा, असा टोला पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी येथे लगावला. 

""राणे यांच्या प्रवेशाला माझा विरोध नाही; मात्र राणे प्रवृत्तीच्या विरोधात सुरू असलेली लढाई सुरूच राहणार आहे. माझी राजकारणाची पद्धत वेगळी आहे. मी माझ्या तत्त्वात इंचभरसुद्धा ढळणार नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. "चांदा ते बांदा' या योजनेअंतर्गत त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी ते बोलत होते. 

ते म्हणाले, ""राणे यांच्या प्रवेशाला मी विरोध करणार नाही. त्यांचा पक्षप्रवेश म्हणजे चित्रपटाच्या वेगवेगळ्या जाहिराती आहेत. त्याबाबत आपण कोणतेही वक्तव्य करू इच्छित नाही. लोकांच्या दृष्टीने त्यांच्या पक्षप्रवेशाचा फरक पडत नाही; परंतु त्यांना पक्षात घेताना भाजपने त्यांची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी. अशा व्यक्तीला थेट मंत्रिपद देणे, योग्य वाटत नाही. भाजप राष्ट्रीय आणि तत्त्व मानणारा पक्ष म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे त्यांना घेण्यापूर्वी योग्य तो विचार करावा.''