मडगावकर सावंतवाडीचे सभापती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

सावंतवाडी - येथील पंचायत समितीच्या सभापती रवी मडगावकर यांना संधी देण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या पंकज पेडणेकर यांना पुढच्या वेळी संधी देण्याचे आश्‍वासन देण्यात आले, तर उपसभापतिपदाची माळ निकिता सावंत यांच्या गळ्यात घालण्यात आली. 

सावंतवाडी - येथील पंचायत समितीच्या सभापती रवी मडगावकर यांना संधी देण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या पंकज पेडणेकर यांना पुढच्या वेळी संधी देण्याचे आश्‍वासन देण्यात आले, तर उपसभापतिपदाची माळ निकिता सावंत यांच्या गळ्यात घालण्यात आली. 

या प्रक्रियेदरम्यान काँग्रेसमध्येच चढ-ओढ बघायला मिळाली; मात्र शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्‍यक असलेले संख्याबळ नसल्यामुळे या प्रकियेकडे पाठ फिरविली. परिणामी ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. येथील पंचायत समितीची सभापती निवड प्रक्रिया आज होणार असल्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह होता. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने श्री. मडगावकर यांच्यासह पेडणेकर आणि संदीप नेमळेकर हे इच्छुक होते; परंतु या सर्वात मडगावकर आणि पेडणेकर यांचे नाव आघाडीवर होते. या सर्व प्रक्रियेदरम्यान इच्छुकांकडून आयत्यावेळी कोणतेही दबावतंत्र येऊ नये, यासाठी तालुकाध्यक्ष श्री. परब यांच्यासह जिल्हा प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. तसेच आम्ही वरिष्ठस्तरावर नावे कळविली आहेत; मात्र याबाबतचा शेवटचा निर्णय काँग्रेस नेते नारायण राणेच घेणार आहेत, असे परब यांनी सांगितले. त्यानुुसार प्रक्रियेच्या एक तास अगोदर आयत्यावेळी बदल झाला, तर अशी शक्‍यता असल्यामुळे इच्छुकांच्या मनात धाकधूक होती. शेवटी बारा वाजण्याच्या सुमारास कणकवलीतून आलेल्या फॅक्‍सवर श्री. मडगावकर आणि सावंत यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार त्यांचे अर्ज भरण्यात आले, तर या प्रक्रियेदरम्यान शिवसेना भाजपचे पदाधिकारी त्या ठिकाणी फिरकले नसल्यामुळे ही प्रक्रिया बिनविरोध पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी जाहीर केले. 

या वेळी नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचे स्वागत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत तालुकाध्यक्ष संजू परब यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. परुळेकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, मावळते सभापती प्रमोद सावंत, प्रकाश कवठणकर, मंदार नार्वेकर, मनीषा गोवेकर, संदीप नेमळेकर, दया परब, सुनंदा राऊळ, राजू परब, बाबू सावंत, गौरी पावसकर, मानसी धुरी, अक्षया खडपे, उत्तम पांढरे, शेखर गावकर, प्रमोद गावडे, गुरू पेडणेकर, नीलेश कुडव, प्रियांका गावडे आदी उपस्थित
आदी उपस्थित होते 

विश्‍वास सार्थकी लावणार - मडगावकर 
सभापतिपदावर विराजमान झाल्यानंतर श्री. मडगावकर म्हणाले, ‘‘काँग्रेस नेते नारायण राणे यांनी टाकलेला विश्‍वास सार्थकी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन तालुक्‍याच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यत पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. या वेळी तालुकाध्यक्ष संजू परब डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या सहकार्यामुळेच मला ही संधी प्राप्त होऊ शकली.’’

पेडणेकरांना पुढची संधी 
या वेळी मडगावकर यांच्यासोबत सभापतिपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या पंकज पेडणेकर यांना पुढच्यावेळी संधी देण्याचे आश्‍वासन या वेळी देण्यात आले. पक्षाने आणि वरिष्ठांनी घेतलेला निर्णय आपल्याला मान्य आहे, असे श्री. पेडणेकर यांनी सांगितले.

Web Title: sawantwadi panchyat committee chair person ravi madgavkar