सावंतवाडीत पर्यटन प्रकल्पांचे वर्षात पुनरुजीवन

सावंतवाडीत पर्यटन प्रकल्पांचे वर्षात पुनरुजीवन

सावंतवाडी शहरात करोडो रुपये खर्च करून शिल्पग्राम, हेल्थपार्क, रघुनाथ मार्केटचे नूतनीकरण आदी पर्यटन प्रकल्प राबविण्यात आले. हे प्रकल्प सध्या विविध कारणांमुळे बंद आहेत.

पालिका निवडणुकीत हा चर्चेचा मुद्दा बनला होता. हे प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सिटीझन एडीटर उपक्रमांतर्गत शुक्रवारी (ता. 20) सकाळच्या येथील कार्यालयात चर्चा घडवून आणण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षाच्या नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील व्यक्ती यात सहभागी झाले होते. यात नगराध्यक्ष बबन साळगावकर, कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, पालिकेचे बांधकाम सभापती बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक विलास जाधव, जीवन रक्षा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मसुरकर, डॉ. संगिता तुपकर, वैशाली देसाई, ऍड. सिध्दार्थ भांबुरे, बिल्डर तथा उद्योजक प्रविण परब, वरिष्ठ उपसंपादक शिवप्रसाद देसाई, वरिष्ठ जाहिरात प्रतिनिधी हेमंत खानोलकर, वरिष्ठ वितरण प्रतिनिधी नाथा कदम, बातमीदार अमोल टेंबकर आदींचा समावेश होता. यावेळी श्री. देसाई यांनी या उपक्रमामागची भूमिका मांडली.

यात झालेली चर्चा अशी : "सकाळचा हा स्त्युत्य उपक्रम आहे. या चर्चेत शहराचा पर्यटनातून विकास झाला पाहिजे हे सर्वांनीच मान्य केले आहे. "हार्ट ऑफ दि सिटी" म्हणून मोती तलावाचा विकास केला आहे. पर्यटन जिल्हा असूनही सिंधुदुर्गाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. पालिकेने सुरू केलेले पर्यटन प्रकल्प येत्या वर्षभरात सुरू केले जातील. सद्यस्थितीत राज्यस्तरावर ठरविलेल्या निकषानुसार हे प्रकल्प चालवायला घेणे परवडत नाही. त्यात बदल करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. शासनाकडून सुध्दा ते मान्य करण्यात आले आहे; मात्र अद्याप सुधारीत आदेश मिळालेला नाही. या प्रकल्पांच्या पुर्नरचनेसाठी निधी उपलब्ध होत आहे. यातून वर्षभरात ते पुन्हा सुरू केले जातील.

शहराबाहेरुन महामार्ग गेला त्याचा फटका बसणार आहे; मात्र यावर मात करून पर्यटन विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहर वाढत आहे. सावंतवाडीचा सेंद्रीय काजू प्रसिध्द करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पालिकेकडून वेबसाईटचे काम करण्यात आले. त्यात महत्वाच्या ठिकाणाचा समावेश करुन माहिती देण्यात आली आहे. पक्षीमित्र संमेलनाच्या माध्यमातून शहराच्या पर्यटनाला फायदा झालेला आहे. विरोधासाठी विरोध न करता एकत्र येवून विकास करायचा आहे. याची ही सकारात्मक सुरवात आहे. सकाळने माध्यम म्हणून यात महत्वाची भूमिका बजावली असून भविष्यात आणखी साथ द्यावी.''
- बबन साळगावकर, नगराध्यक्ष-सावंतवाडी

"सावंतवाडीच्या पर्यटनाबाबत पालकमंत्री दिपक केसरकर यांनी नगराध्यक्ष असताना विशेष निधी आणला. यातून शिल्पग्राम, हेल्थफार्म हे प्रकल्प साकारले. मात्र लाखो करोडो रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले प्रकल्प बंदावस्थेत आहेत. मुंबई-पुण्याच्या धर्तीवर प्रकल्प चालविण्यासाठी निकष, भाडे ठरविण्यात आले. त्यात बदल व्हायला हवा. हे प्रकल्प पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. त्यात महिला बचत गटांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेले प्रशिक्षण संबंधित महिलांना द्यावे, जेणेकरुन त्यातील फायदा थेट महिलांच्या चुलीपर्यंत पोहोचले; मात्र या सकारात्मक आणण्यासाठी व भाड्याची रक्कम कमी करण्यासाठी सह्याच्या पत्रांची मोहीम राबवून शासनाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. यासाठी एकटे नगराध्यक्ष काहीच करु शकत नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे. शहराच्या बाहेरुन रेल्वे, महामार्ग गेलेला याचे दुष्पपरिणाम शहराला भोगावे लागणार आहे. त्यामुळे पर्यटकाला आकर्षीत करण्यासाठी होम स्टे टुरीझम होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आपल्याकडे जैवविविधता आणि निसर्गसौंदय असणारा नरेंद्र डोंगर आहे, त्यामुळे अशा गोष्टीकडे पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी योग्य ती माहीती देणारी वेबसाईट बनविणे गरजेचे आहे. नागरीकांची होम स्टे साठी मदत घेणे गरजेचे आहे. चायनिज मोगलाईप्रमाणे काळ्या वाटाण्याची उसळ, घावणे, नारळाचा रस आदी खाद्य संस्कृतीचे ब्रॅंडींग आवश्‍यक आहे.''
- डॉ. जयेंद्र परुळेकर, प्रवक्ते-जिल्हा कॉंग्रेस

"शहरात उभारण्यात आलेले शिल्पग्राम, हेल्थफार्म प्रकल्प खर्चिक आहेत. ते चालविणे शक्‍य नाही. त्यामुळे पालिकेने स्वतः हे प्रकल्प चालवायला घ्यावे. यासाठी केरळमधील तज्ञांची नियुक्ती करावी. हेल्थपार्कसारखा प्रकल्प पर्यटनदृष्ट्या चांगल्या पद्धतीने चालू शकतो. यासाठी पालिकेचा पुढाकार आवश्‍यक आहे.''
- राजू मसूरकर, माजी नगरसेवक-कॉंग्रेस

"हेल्थफार्म, शिल्पग्राम असे प्रकल्प दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात राबविले जातात. येथील बंद प्रकल्प पुन्हा एकदा जीवंत करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेला पाठपुरावा करताना पर्यटनाचाही अभ्यास व्हायला हवा. येणारे पर्यटक सोशल मिडीयावर अभ्यास करुन येतात. त्या दृष्टीने पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी तंत्रज्ञानही वापरावे. शहरातील प्रकल्पाची वेबसाईटच्या माध्यमातून प्रसिध्दी होणे गरजेचे आहे. सुदैवाने पालकमंत्री याच शहराचे रहिवासी आहेत. भाजपकडे सत्तास्थान आहे. त्यामुळे काही तज्ञ लोकांना घेवून थेट गोव्याकडे जाणारा पर्यटकांना येथे आकर्षीत करण्यासाठी योग्य तो अभ्यास होणे गरजेचे आहे. व्यावसायिकता डोळ्यासमोर ठेवून पालिकेनेच आता पुढाकार घेणे गरजेचे आहे.''
- ऍड. सिद्धार्थ भांबुरे

"शहरात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रवेशव्दारावर माहीती देणारे फलक लावणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी शहरातील माठेवाडातळी, शिल्पग्राम आदी प्रकल्पांची माहिती त्यावर देण्यात यावी. शिल्पग्राममध्ये कोकणातील दशातवार, चपईनृत्य, समईनृत्य आदी सांकृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात यावेत. त्याचा फायदा पर्यटकांना होवू शकतो. हेल्थ टुरीझमला महत्व देवून पंचकर्म ट्रीटमेंट द्यावी. त्यासाठी आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत व योग केंद्राची मदत घ्यावी.''
- डॉ. संगीता तुपकर

"पर्यटकांना माहिती देण्याची व्यवस्था असायला हवी. येणाऱ्या पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी विविध अभ्यासपूर्व व्हायला हवेत. शहरात जागोजागी माहिती कक्ष उभारावे. बंद प्रकल्प नव्याने सुुरू होणे काळाची गरज आहे तरच शहरात पर्यटक येवून स्थिरावतील.''
- वैशाली देसाई

"शहराला ऐतिहासीक वारसा आणि नैसगिक देणगी लाभलेली आहे. मुळात पालिकेकडुन पर्यटकवाढीसाठी अनेक उपक्रम राबविले होते. त्यात शिल्पग्राम हेल्थफार्म अशा प्रकल्पाचा समावेश आहे. त्याकडे पर्यटक सुध्दा आकर्षित होते; मात्र हे प्रकल्प यशस्वी होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रकल्पाची जबाबदारी घेणाऱ्या एजन्सीला परवडेल असे दर निश्‍चीत करणे गरजेचे आहे. "क" वर्ग नगरपालिका असल्यामुळे पालिका यावर खर्च करु शकत नाही किंवा ते चालवू शकत नाही. त्यामुळे एक पाऊल मागे येवून अडचणीत असलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी नियोजनबध्द विकास व्हावा.''
- प्रवीण परब, बांधकाम व्यावसायिक

"शहरातील बंदावस्थेत असलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी पालिका आणि पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून आज ही प्रयत्न सुरू आहेत. परंतू अशा प्रकल्पावर केवळ निवडणुकीच्या फायद्यासाठी राजकीय टिका करीत न बसता सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी तज्ञ विचारवंताना एकत्र घेवून योग्यतो प्रयत्न होणे गरजेचे आहे.''
- विलास जाधव, माजी नगरसेवक

"पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वॉटर पार्कसारखा प्रकल्प सुरू झाल्यास त्याचा फायदा होवू शकतो. शिल्पग्रामसारखे बंद प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न आहेत. त्या दृष्टीने शासनाकडे योग्यतो पाठपुरावा करण्यात आला आहे आणि काही निर्णय आमच्या स्तरावर घेण्यात आल्या आहेत.''
- बाबू कुडतरकर, बांधकाम सभापती सावंतवाडी पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com