निम्म्या शाळांची अवस्था वाईट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

पालिकेच्या 21 शाळांपैकी निम्म्या शाळांच्या इमारतींची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे पावसापूर्वी या शाळांची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी, असे आदेश नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी शिक्षण विभागाला पालिकेच्या आजच्या विशेष सभेत दिले.

रत्नागिरी - पालिकेच्या 21 शाळांपैकी निम्म्या शाळांच्या इमारतींची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे पावसापूर्वी या शाळांची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी, असे आदेश नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी शिक्षण विभागाला पालिकेच्या आजच्या विशेष सभेत दिले. शहरात पाणीटंचाई असून, पाणी पुरवठ्यासाठी वारंवार मागे लागल्यानंतरच पाण्याचा टॅंकर चार दिवसांनी मिळतो. इतर लोकांकडे मात्र वारंवार जातो. त्याचे नियोजन करावे, अशी मागणी नगरसेवक मुसा काझी यांनी या सभेत केली.

पालिकेची शाळा क्र. 15 दामले विद्यालय बालवाडीचा वर्ग मॉडेल बालवाडीप्रमाणे (वंडर किडस) अद्ययावत करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाला मंजुरी द्यावी, अशी मागणी शिल्पा सुर्वे यांनी केली. या विषयाच्या अनुषंगाने श्री. पंडित म्हणाले की, पावसापूर्वी नादुरुस्त शाळांची दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी शिक्षण विभागाला दिल्या. शाळा क्र. 2 ची इमारत देखील मोडकळीस आली आहे.

विषयपत्रिकेवर ठेवण्यात आलेल्या सोळा विषयांवर चर्चा झाली. अनेक विषय सर्वांनुमते मंजूर करण्यात आले. काही विषयांबाबत विरोधकांनी तांत्रिक गोष्टी पूर्ण करून तो मंजूर करावा, असे स्पष्ट केले. राजिवडा येथील आरक्षण क्र. 72 हे बालोद्यानासाठी आरक्षित आहे. आरक्षण क्र. 74 हे बाजार केंद्रासाठी आरक्षित आहे. ही आरक्षणे विकसित करण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक सोहेल मुकादम यांनी केली. त्यावर विरोधक नगरसेवक सुदेश मयेकर, रोशन फाळके म्हणाले, या विषयांना यापूर्वी तुम्हीच विरोध केला होता. हा विषय न्यायप्रवीष्ट नसेल तर त्याला आमचा विरोध नाही. या सर्व तांत्रिक बाबी पूर्तता करून ती विकसित करा, असे सुचविले.

भाजीविक्रेते : कधी पुढे, कधी मागे?
मारुती मंदिर येथील भाजी विक्रत्यांना कोणाच्या आदेशावरून पुढे आणण्यात आले. ते कधी मागे गेले आणि कधी पुढे आले हे समजलेच नाही, असा प्रश्‍न विरोधकांनी केला. यावर राहुल पंडित म्हणाले की, त्यांना ज्या ठिकाणी हलविण्यात आले होते तेथे सुविधा नाहीत. त्यामुळे त्यांना पुढे आणले आहे. पंधरा दिवसात सुविधा उपलब्ध करून त्यांना पुन्हा स्टेडिअमच्या मागे बसविले जाईल. तसेच तेथील 24 गाळे दुरूस्त करून त्यांचे मूल्यांकन करून त्याचाही लिलाव केला जाईल.

Web Title: School building issue in Ratnagiri