शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

शिर्के प्रशालेला सुटी : कारण अद्याप अस्पष्ट 
रत्नागिरी : शहराजवळील कारवांचीवाडी येथे बुधवारी (ता. 15) रात्री एका शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. वेदांत राहुल माने (वय 13, कारवांचीवाडी) असे त्या मुलाचे नाव आहे. शिर्के हायस्कूलमध्ये तो आठवीत शिकत होता. शाळेमध्ये घडलेल्या एका घटनेवरून वर्गशिक्षकाने त्याला पालकांना बोलावून आणण्यास बजावले होते. या दबावाखाली त्याने आत्महत्या केली असावी, असे बोलले जात आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. 

वेदांत बुधवारी (ता. 15) नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. सायंकाळी सव्वापाच वाजता शाळा सुटल्यानंतर तो कारवांचीवाडी येथील घरी गेला. घरात आई व इतर नातेवाईक असताना त्यांच्याशी न बोलता थेट बेडरूममध्ये गेला. कपडे बदलण्यासाठी खोलीत गेलेला वेदांत बराच वेळ बाहेर आलाच नाही. त्यामुळे आईने दरवाजा ठोठावला; मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आई-वडील व इतर नातेवाइकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. खोलीत वेदांतने ओढणीच्या साह्याने फॅनला गळफास घेतला होता. त्याला तत्काळ खाली उतरून नजीकच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांनी वेदांतला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. 

वेदांतचा मृत्यू झाल्याचे समजताच आई-वडिलांसह नातेवाइकांनी टाहो फोडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर पंचनामा झाला. रात्री उशिरा ग्रामीण पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. आज सकाळी वेदांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वेदांतच्या मृत्यूमुळे शिर्के प्रशालेला आज सुटी देण्यात आली होती. मुख्याध्यापकांसह अनेक शिक्षक त्याच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते. वेदांतबाबत जी घटना घडली होती, त्याबाबत शिक्षकांनी पाच दिवसांपूर्वीच पालकांना अवगत केले होते.