‘सी-वर्ल्ड’ गुंडाळणार ?

‘सी-वर्ल्ड’ गुंडाळणार ?

सावंतवाडी - सिंधुदुर्गाच्या पर्यटन विकासासाठीचा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ मानल्या जाणाऱ्या सी-वर्ल्डच्या उभारणीबाबत राज्याकडून हालचाली मंदावल्या आहेत. हा प्रकल्प गुंडाळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

साधारण २००७ पासून सी-वर्ल्ड प्रकल्प साकारण्यासाठी मुंबईसह कोकणातील विविध ठिकाणे तपासण्यात आली. यात हा प्रकल्प सिंधुदुर्गातील तोंडवली, वायंगणी या गावांमध्ये राबवण्याचे सरकारकडून निश्‍चित झाले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत प्रकल्पाचे १८ ऑक्‍टोबर २०११ रोजी सादरीकरण झाले. तेव्हापासून याला खरी गती आली. हा अशा पद्धतीचा आशिया खंडातील पहिलाच प्रकल्प ठरणार होता. 

दरवर्षी दहा लाख पर्यटकांचे उद्दिष्ट ठेवून याची उभारणी केली जाणार होती. सुरुवातीला एक हजार ३९० एकरमध्ये प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते; मात्र इतकी जमीन संपादित करण्यास स्थानिकांचा प्रचंड विरोध झाल्याने हा प्रकल्प वादात सापडला.

आघाडी सरकार जाऊन युतीची सत्ता आली. या प्रकल्पाचा नव्याने अभ्यास करण्यात आला. यात एक हजार ३९० एकरांवरील हा प्रकल्प ३५० एकरांमध्ये बसू शकतो, असा निष्कर्ष काढला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रकल्पासाठी विशेष आग्रही होते. 

भूमिपुत्र मात्र विरोधाच्या भूमिकेवर ठाम राहिले. हा प्रकल्प ‘पब्लिक- प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर राबविला जात आहे. अशा मोठ्या प्रकल्पांसाठी गुंतवणूकदार व्यक्ती किंवा संस्था यांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रक्रियेआधीच काही गुंतवणूकदार पडद्यामागे तयार असतात. 

या प्रकल्पाची एकूण कारभार पाहून गुंतवणूकदारांचे यातील स्वारस्य निघून गेल्याचे समजते. आता हा प्रकल्प राज्याकडून गुंडाळला जाण्याची शक्‍यता आहे.

हा प्रकल्प व्हावा, यासाठी सरकारचे सर्व दरवाजे ठोठावले. या प्रकल्पक्षेत्रात माझी स्वतःची जमीन असून माझ्यासह अन्य काही जण जमिनी द्यायला तयार होते; पण सरकारी यंत्रणा या प्रकल्पाबाबत सकारात्मक नाही. यामुळे हा प्रकल्प जवळपास गुंडाळल्यात जमा आहे. 
 - श्रीराम पेडणेकर, जमीन मालक

सी-वर्ल्ड दृष्टिक्षेपात
२००७ मध्ये प्रकल्पाची घोषणा
२४ जून २००९ रोजी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी 
२०१३-१४ च्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद
२०१५-१६ च्या अर्थसंकल्पात सी-वर्ल्डचा उल्लेख
युती सरकारकडून कमी जागेत प्रकल्प बसविण्याची घोषणा
२०१७ च्या ‘व्हिजिट महाराष्ट्र इअर’मध्ये समावेश
५०९ कोटी खर्चाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
२० हजार लोकांना रोजगार
दहा वर्षांत ३०० कोटींचे उत्पन्न अपेक्षित 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com