खैरतोडीवरील कारवाईचे गौडबंगाल

खैरतोडीवरील कारवाईचे गौडबंगाल

चिपळूण - शहरालगतच्या कळबंस्ते येथील जिल्हा परिषद पशुसंवर्धन कार्यालय आवारातील खैराची झाडे बेकायदा तोडण्यात आली. याबाबत डॉ. संतोष निमुणकर यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव महिन्यापूर्वीच पशुसंवर्धन आयुक्तांकडे पाठविण्यात आला; मात्र महिना झाला तरी अद्याप कारवाईच्या हालचाली झालेल्या नाहीत. यावरून कारवाईत नेमके गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

कळबंस्ते येथील जिल्हा परिषदेच्या पोल्ट्रीच्या आवारातील खैराची झाडे साफसफाईच्या नावाखाली तोडण्यात आली. खैरतोडीसाठी वनविभागाची परवानगी घेतली नाही. याबाबत पंचायत समिती गटनेते राकेश शिंदे यांनी वनविभाग, तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार केली. 

यावरून झालेल्या चौकशीत डॉ. संतोष निमुणकर यांना दोषी ठरवण्यात आले. फेब्रुवारी २०१८ पासून याबाबत चर्चा, तक्रारी होत आहेत; मात्र प्रत्यक्षात कारवाई झालेली नाही. कारवाई होत नसल्याने पंचायत समितीच्या मासिक सभेत पंचायत समितीमधील जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला टाळे ठोकण्याबाबत चर्चा झाली. खैरतोड कारवाईचा प्रस्ताव पशुसंवर्धन आयुक्तांकडे पाठवल्याचे सांगून जिल्हा परिषदेने हात झटकले. सदस्यांची तालुकास्तरावर ओरड सुरू आहे. पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडे कारवाईबाबतचा पाठपुरावा केला जात नाही. परिणामी खैरतोड प्रकरण थंडावल्याची चर्चा सुरू झाली आहे.

एक दृष्टिक्षेप

  • वनविभागाने मूल्यांकन केले नव्हते
  • डॉ. निमुणकरांनी १३ हजार रुपये केले जमा 
  • वनखात्याकडून दंडात्मक कारवाईचा बडगा


पशुसंवर्धन आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
खैरतोड प्रकरण उजेडात आल्यानंतर ते मिटवण्यासाठी काही अधिकारी, राजकीय पुढारी प्रयत्नशील होते; मात्र प्रत्येक मासिक सभेत यावरून गदारोळ सुरूच राहिला. परिणामी कारवाईस चालना मिळत गेली. त्यामुळे पशुसंवर्धन आयुक्त कारवाईसाठी नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

खैरतोड प्रकरणाची परिपूर्ण चौकशी झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी डॉ. संतोष निमुणकरांवर दोषारोप निश्‍चित केले आहेत. त्यांनी कारवाईचा प्रस्ताव पशुसंवर्धन आयुक्तांना दिला. पशुसंवर्धन आयुक्तांना याचे गांभीर्य नसेल, तर येथील पशुसंवर्धन विभाग बंद करावा लागेल.
- राकेश शिंदे,
गटनेता, पंचायत समिती, चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com