हृदयाला छिद्र असलेल्या तरुणीला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

रत्नागिरी - लहानपणापासून धाप लागणे व छातीत धडधडणे यामुळे त्रस्त असलेल्या राजापुरातील एका तरुणीवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. येथील रामनाथ हॉस्पिटलच्या "कोकण हृदयालया'त झालेल्या या मोफत शस्त्रक्रियेने या तरुणीला नवे जीवन मिळाले.

रत्नागिरी - लहानपणापासून धाप लागणे व छातीत धडधडणे यामुळे त्रस्त असलेल्या राजापुरातील एका तरुणीवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. येथील रामनाथ हॉस्पिटलच्या "कोकण हृदयालया'त झालेल्या या मोफत शस्त्रक्रियेने या तरुणीला नवे जीवन मिळाले.

ऋणाली हरिश्‍चंद्र चौगुले ही वीस वर्षांची तरुणी धाऊलवल्ली (ता. राजापूर) गावातील. वयाच्या पाचव्या वर्षापासून तिला धाप लागायची. छातीत धडधडायचे. कुठलेच काम व्हायचे नाही. जन्मतःच हृदयालयातील वरच्या कप्प्यातील मधल्या भिंतीला मोठे छिद्र असल्याचे निदान झाले. वैद्यकीय परिभाषेत याला अेट्रियेल सेप्टल डिफेक्‍ट असे म्हणतात. आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने पुढील उपचार होऊ शकले नाहीत. त्रास वाढल्याने तिला डॉ. संजय लोटलीकर यांच्या रामनाथ हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.

या आजारात शस्त्रक्रिया हेच एकमेव औषध. ओपन हार्ट सर्जरी करायची ठरली. रामनाथ हॉस्पिटलच्या कोकण हृदयालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमेय आमोणकर, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. कट्टीमणी के. एस., हृदयशल्यविशारद आणि अशा शस्त्रक्रियेतील खास भूलतज्ज्ञ कोल्हापूरच्या डॉ. शीतल देसाई यांनी ऋणालीच्या हृदयाचे यशस्वी ऑपरेशन केले. पाच दिवसांच्या रुग्णालयीन शुश्रुषेनंतर तिला पाठवण्यात आले. घरी जाताना ऋणालीला कृतज्ञतेचे शब्द फुटत नव्हते. रुग्णालयातील परिचारिका, डॉक्‍टर लोटलीकर, डॉ. आमोणकर, डॉ. कट्टीमणी, डॉ. अभिजित मोहिते, डॉ. समीर आरेकर, डॉ. सुमित कसालकर आणि डॉ. अनुराग बेडेकर हेसुद्धा उपस्थित होते. तेव्हा सर्वांनाच भावना अनावर झाल्या होत्या.
विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया या कोकण हृदयालयात तिची परिस्थिती ग्राह्य धरून संपूर्णतः मोफत करण्यात आली. शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ ऋणालीला मिळाला. तिच्यासारखे अनेक रुग्ण आजही रत्नागिरीमध्ये आहेत. हृदयरोगाने ग्रासलेली लहान मुलेसुद्धा आहेत. अशा तातडीच्या उपचार व शस्त्रक्रियेची गरज असेल तर रुग्णांनी रामनाथ हॉस्पिटलच्या कोकण हृदयालयाशी संपर्क साधावा. शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.

Web Title: Serious heart patient survived