पाणी वितरणाचा प्रश्‍न गंभीर

पाणी वितरणाचा प्रश्‍न गंभीर

रत्नागिरी - शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील अनियमिततेने अधिक गंभीर स्वरूप घेतले आहे. तेली आळी येथील महिलांनी आज पुन्हा मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणीटंचाईच्या प्रश्‍नावर चर्चा केली. सुधारित पाणीपुरवठा योजनेमध्ये सहकारनगरची पाण्याची टाकी सुरू केली जाणार होती; मात्र काही लोकप्रतिनिधींच्या हट्टापायी निवडणुकीनंतर सहकारनगरला ५ लाख लिटर पाणी दिले जात आहे. त्यामुळे अनेक भागातील नळाचे पाणी पळाल्याची चर्चा आहे. टंचाईचा हा फास अधिक घट्ट होण्यापूर्वीच मुख्याधिकारी महत्त्वाची बैठक बोलावून त्यावर तोडगा काढणार आहेत. वेळप्रसंगी सहकारनगरचे पाणी बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला. 

थंडी गायब झाल्यानंतर उन्हाचे चटके बसण्यास सुरवात होते न होते तोच शहरात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. निवडणुकीनंतर ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वितरण व्यवस्थेमध्ये असे काय घडले, की ज्यामुळे पाणीपुरवठ्याची संपूर्ण घडी विस्कटली गेली, याबाबत जोरदार तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आपल्या प्रभागातील नागरिकांची मर्जी राहावी यासाठी लोकप्रतिनिधी लाइनमनवर दबाव टाकत आहेत का? काही लाइनमन पाण्यासाठी आमिषाला बळी पडत आहेत का? असे अनेक विषय सध्या चर्चेत आहेत. शहरात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गेले तीन महिने आम्हाला मुबलक पाणीच मिळाले नाही. उतरत्या वयात तासन्‌तास नळाजवळ उभा राहावे लागले. फेऱ्या माराव्या लागतात. करंगळीएवढ्या पडणाऱ्या पाण्याने आम्ही तहान कशी भागवायची, अशी संतप्त प्रतिक्रिया तेलीआळीतील महिलांच्या शिष्टमंडळाने दिली. भाजपचे नगरसेवक मुन्ना चवंडे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुख्याधिकारी अरविंद माळी यांना भेटले. 

मुख्याधिकारी श्री. माळी, अधिकारी, कर्मचारी आदींची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. यामध्ये पाणी वितरण व्यवस्थेची नेमकी परिस्थिती जाणून घेणार आहेत. ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्यावर तत्काळ तोडगा काढून वितरण व्यवस्था सुधारण्यावर भर दिला जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com