पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा नवा पायंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

कळणे - उत्सवांच्या परंपरांमधील कालबाह्य गोष्टींना छेद देण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. बांद्यातील अनुराधा रुपेश पाटकर यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाचा नवा पायंडा घातला आहे. घरच्या गणपतीची पूजा करण्यासाठी पुरोहिताची वाट पाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे; परंतु सौ. पाटकर यांनी पुरोहिताशिवायच स्वतःच गणपतीची पूजा केली.

कळणे - उत्सवांच्या परंपरांमधील कालबाह्य गोष्टींना छेद देण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. बांद्यातील अनुराधा रुपेश पाटकर यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाचा नवा पायंडा घातला आहे. घरच्या गणपतीची पूजा करण्यासाठी पुरोहिताची वाट पाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे; परंतु सौ. पाटकर यांनी पुरोहिताशिवायच स्वतःच गणपतीची पूजा केली.

गणेशोत्सवातील प्रदूषण हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, मूर्तींसाठी वापरण्यात येणारे घातक रासायिक रंग आदींमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. त्यामुळे गणेश मूर्ती दान करण्याची मोहीम अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरू केली आहे. अर्थात या मोहिमेला शहरी भागात प्रतिसाद मिळत आहे; परंतु कोकणातील ग्रामीण भागात मूर्ती दान करण्याचा विचार रुजणे जरा कठीणच. येथील गणपतीच्या मूर्तींचे नद्या, ओढे, तळ्यांमध्ये विर्सजन करण्यात येते. गेल्या काही वर्षांत घरगुती गणपतींचे आकारही वाढतच आहेत. त्यामुळे जलप्रदूषणाचा प्रश्‍न ग्रामीण भागातही निर्माण होत आहे. अर्थात जुन्या परंपरा व उत्सवी वातावरणात पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या या पारंपरिक विसर्जन पद्धती बदलण्यासाठीच्या मुद्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. सामाजिक स्तरावर विर्सजनाच्या नव्या पद्धतींचा स्वीकार होणे कठीण असले, तरी बांद्याच्या अनुराधा पाटकर यांच्या कुटुंबीयांनी मात्र पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाची पद्धती गेल्या तीन वर्षांपासून अमलात आणली आहे. तीन वर्षांपूर्वी पाटकर यांनी घराशेजारच्या हौदात मूर्ती विसर्जन केले होते. गेल्या वर्षी त्यांनी घरात असलेल्या लहान गणेशमूर्तीला नव्याने रंग देऊन प्रतिष्ठापना केली. पाचव्या दिवशी मूर्तीची उत्तरपूजा केली. त्यानंतर मूर्ती घरातच जतन करून ठेवली. यंदा त्याच मूर्तीला नव्याने रंग दिला व प्रतिष्ठापना केली. कोकणातील घरगुती गणेशोत्सवात घरातील पुरुषांच्या हस्ते पुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली गणेशाची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून सौ. पाटकर स्वतः गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात. दररोजची पूजाही त्याच स्वतः करतात. पाटकर कुटुंबीयांनी गणेशोत्सवातील पारंपरिकतेलाही नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. गणेशोत्सवातील प्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी घालून दिलेले उदाहरण निश्‍चितच आदर्शवादी ठरेल.

"माझे पती डॉ. रूपेश पाटकर यांनी तीन वर्षांपूर्वी गणपतीचे हौदात विसर्जन करण्याची कल्पना मांडली. त्या वेळी ती गोष्ट माझ्या मनाला फारशी पटली नाही; मात्र गेल्या दोन वर्षांत आम्ही गणपतीची एकच मूर्ती रंगवून पूजली. हे करताना मला कुठेही अपराध वाटला नाही. गणपतीचे उत्साहाने व भक्तिभावाने पूजन केल्यानंतर मला विर्सजनाची परंपरा मोडल्याचा कुठेही खेद वाटला नाही. शेवटी शेतकऱ्यांचे सण, उत्सव हे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरायला हवेत. म्हणजेच ते पर्यावरणपूरक ठेवायला हवेत, हे मला मनोमन पटले.
- अनुराधा पाटकर, लेखिका

Web Title: Set a new benchmark environmental component ganesamurti