मुंबईकरांच्या अंगणात रंगतोय शिमगोत्सव

राजेंद्र बाईत
गुरुवार, 16 मार्च 2017

राजापूर - कोकणात शिमगोत्सवाला विशेष महत्त्व आहे. काही चाकरमान्यांना सुटीअभावी शिमगोत्सवाचा आनंद लुटता येत नाही. अशांसाठी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईच्या चेंबूर शाखेतर्फे गेली चार वर्षे मुंबईमध्ये शिमगोत्सव साजरा केला जात आहे. कोकणात शिमगोत्सवातील खेळे, गोमू आणि संकासूर कोकणाच्या सीमा ओलांडून मुंबईकरांच्या अंगणामध्ये खेळू लागला आहे.  

राजापूर - कोकणात शिमगोत्सवाला विशेष महत्त्व आहे. काही चाकरमान्यांना सुटीअभावी शिमगोत्सवाचा आनंद लुटता येत नाही. अशांसाठी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईच्या चेंबूर शाखेतर्फे गेली चार वर्षे मुंबईमध्ये शिमगोत्सव साजरा केला जात आहे. कोकणात शिमगोत्सवातील खेळे, गोमू आणि संकासूर कोकणाच्या सीमा ओलांडून मुंबईकरांच्या अंगणामध्ये खेळू लागला आहे.  

कोकणात शिमगोत्सवात ग्रामदैवतेचे मुखवटे बसविलेल्या आणि आकर्षकपणे सजविलेल्या पालख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात सध्या गावकऱ्यांच्या घरोघरी भेटी देत आहेत. त्यांच्यासोबत रंगीबेरंगी वेषभूषेतील खेळ्यांचे जथ्थे आहेत. अनेकांना नोकरीमध्ये सुटी न मिळाल्याने वा अन्य कारणाने कोकणातील घरी येऊन शिमगोत्सवाचा आनंद लुटता येत नाही.

मुंबईकरांची ही कसर गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई चेंबूर शाखेने भरून काढली आहे. या शाखेतर्फे मुंबईत शिमगोत्सव साजरा केला जातो. मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांकडून धुलिवंदनाच्या दिवशी दिवसभर शिमगोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही चेंबूर भागामध्ये हा शिमगोत्सव साजरा होताना या भागातील सुमारे अडीचशे मुुंबईकरांच्या अंगणामध्ये शिमगोत्सवातील खेळे आणि गोमू नाचले. चाकरमान्यांनीह मनोभावे त्यांचे स्वागत करून पाहुणचार केला. ढोलकी आणि डफाचा ठेका त्याच्या जोडीला टाळाचा नाद यावर नाचणारा गोमू आणि संकासूर सध्या मुंबईकरांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. यातून सामाजिक प्रबोधनासह कोकणातील पारंपरिक लोककला जपली जात आहे. संघाच्या चेंबूर शाखेच्या या उपक्रमाबाबत कौतुक केले जात आहे.

नोकरीमुळे अनेकांना कोकणातील आपल्या घरी जाऊन शिमगोत्सवाचा आनंद लुटता येत नाही. अशांना चेंबूर शाखेच्या माध्यमातून शिमगोत्सवाची संधी मिळते. गेली चार वर्ष सातत्याने मुंबई येथे हा शिमगोत्सव साजरा केला जात आहे. यामध्ये कोंडतिवरे (राजापूर) येथील दत्ताराम बाणे हे गायक म्हणून जबाबदारी पार पाडीत असून त्यांना गणपत भारती, दत्ताराम शिगवण आदींची साथ लाभत आहे.
- भास्कर चव्हाण, अध्यक्ष, चेंबूर शाखा

Web Title: shimgotsav in mumbai