शिवसेना, भाजपच्या स्वबळाच्या हालचाली

शिवसेना, भाजपच्या स्वबळाच्या हालचाली

मालवण - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेसह सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर केल्यानंतर गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

त्यामुळे येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागले आहेत. भाजपकडूनही स्वबळाची तयारी करण्यात येत आहे. 

दरम्यान, एकीकडे भाजपकडून स्वबळाची तयारी केली जात असताना काँग्रेसमधील अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या विषयावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह वाढण्यास सुरवात झाली आहे. यात काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजते. त्यामुळे भाजप पक्ष प्रवेशाच्या विषयावरून शहरातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे.

पालिका निवडणुकीत जनतेच्या इच्छेखातर तसेच प्रस्थापितांना पालिकेतून हद्दपार करण्याच्या मुद्द्यांवर शिवसेना-भाजप युती झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्षासह युतीची सत्ता आली. यात भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा उत्साह आणखी वाढला. त्यानंतर आता होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी युती आवश्‍यक असल्याचे मत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होते. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये गेले काही दिवस युतीबाबत चर्चाही सुरू होती. यात भाजपकडून ५० टक्के जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघांवर दावा करण्यात येत होता. मात्र तालुक्‍यात भाजपपेक्षा शिवसेनेचे प्राबल्य जास्त असल्याने शिवसेनेने प्रमुख जिल्हा परिषद मतदारसंघांवर आपलाच दावा असेल, भाजपला दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती मतदारसंघ सोडण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र भाजपकडून मतदारसंघांची वाढती मागणी लक्षात घेता युती होण्याची शक्‍यता धूसर बनली होती. त्यामुळे युतीबाबत पक्षांच्या वरिष्ठांकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यातच शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आम्ही स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचेही स्पष्ट केले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत युती झाली असती तर काँग्रेससमोर आव्हान निर्माण करता आले असते असे चित्र होते; मात्र युती फिसकटल्याने याचा काँग्रेसला चांगलाच फायदा होणार असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधून बोलले जात आहे. किनारपट्टी भागाबरोबर अन्य भागात गेल्या काही वर्षांत शिवसेना संघटना बऱ्यापैकी वाढीस लागली आहे. त्यामुळे याचा फायदा या निवडणुकीत शिवसेनेस नक्कीच होईल, अशी अपेक्षा शिवसेना पदाधिकाऱ्यांना आहे. याउलट पालिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ग्रामीण भागात भाजपचे खाते खोलण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. 

भाजपने पालिका निवडणुकीच्या निमित्ताने ज्या प्रस्थापितांच्या विरोधात रान उठविले त्यांनाच आता भाजपमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. यात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे जुने माजी नगरसेवक तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची नावे पुढे येत आहेत. काँग्रेसच्या या जुन्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घेण्यास भाजपच्या जुन्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तीव्र विरोधही केला आहे; मात्र भाजप पक्षश्रेष्ठींकडून याची गंभीर दखल घेतली जात नसल्याने भाजपमधील अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या पवित्र्यात आहेत. शहरातील ज्या जनतेने पालिका निवडणुकीत भाजपवर विश्‍वास टाकला, त्याच भाजपकडून अशा लोकांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याने नाराजी आहे.

सेनेला पोषक वातावरण
तालुक्‍यातील सर्वच मतदारसंघांवर सध्या काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या शिवसेना, भाजपला काँग्रेसला टक्कर देण्यासाठी खडतर मेहनत घ्यावी लागणार आहे. तालुक्‍यातील सद्यःस्थिती पाहता भाजपपेक्षा शिवसेनेस चांगले पोषक वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com