माटणे, फोंड्यात सेनेची मैत्रीपूर्ण लढत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

दोडामार्ग - माटणे (ता. दोडामार्ग) व फोंडा (ता. कणकवली) जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक युती झाली तरीही शिवसेना मैत्रीपूर्ण लढतीने लढविणार आहे. दोन्ही जागांवर शिवसेनेला विजयाची खात्री असल्याने कणकवली येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत तसा निर्णय झाल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.

दोडामार्ग - माटणे (ता. दोडामार्ग) व फोंडा (ता. कणकवली) जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक युती झाली तरीही शिवसेना मैत्रीपूर्ण लढतीने लढविणार आहे. दोन्ही जागांवर शिवसेनेला विजयाची खात्री असल्याने कणकवली येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत तसा निर्णय झाल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.

माटणे व फोंडा येथील जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. सध्या माटणेत भाजपचा तर फोंड्यात कॉंग्रेसचे सदस्य आहेत. असे असले तरी दोन्ही जागा जिंकण्याची खात्री शिवसेनेला असल्याने या जागांवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा पर्याय शिवसेनेने भाजपसमोर ठेवला आहे. माटणेतून शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी आणि फोंड्यातून ज्येष्ठ शिवसैनिक आबू पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.

माटणे हा पूर्वीचा कसई जिल्हा परिषद मतदारसंघ. कसई दोडामार्ग नगरपंचायत अस्तित्वात आली आणि मतदारसंघाचे नाव कसईऐवजी माटणे असे झाले. कसई हा पूर्वी पंचायत समिती मतदारसंघ होता. माटणे व कसईचे आता माटणे व झरेबांबर असे नामकरण झाले. मागच्या वेळेला माटणे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ भाजपकडे तर कसई पंचायत समिती मतदारसंघ शिवसेनेकडे होता. तीनपैकी दोन जिल्हा परिषद भाजपकडे (माटणे व कोनाळ) तर सासोली शिवसेनेकडे होती. यापैकी सासोली व माटणेत युतीचे उमेदवार जिंकले, तर कोनाळमध्ये राष्ट्रवादीचा विजय झाला होता.

आता युतीची चर्चा माटणे मतदारसंघावरच येऊन थांबते आहे. याला कारण आहे खुल्या प्रवर्गातील एकमेव जागा, कोनाळ व सासोली महिलांसाठी आरक्षित झालेत. त्यामुळे सर्व महत्त्वाकांक्षी उमेदवारांचे लक्ष माटणेकडेच लागले आहे. सद्य:स्थितीत युतीचे घोडे त्याच जागेमुळे अडले आहेत. भाजपचे विद्यमान सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांचा त्या जागेवर दावा आहे, पण जागा खुल्या प्रवर्गासाठी असल्याने जिल्हा सचिव रंगनाथ गवस व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश गवसही तेथून लढण्यास इच्छुक आहेत. तिघेही आपापल्या परीने उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी त्या मतदारसंघात बऱ्यापैकी विकासकामे केली आहेत. खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांचा निधी त्यांनी माटणेकडे वळवून गेल्या पाच वर्षांतील भाजपच्या त्या मतदारसंघाकडे झालेल्या दुर्लक्षाचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला आहे.

युतीचे काय होणार?
मागच्या फॉर्म्युल्याप्रमाणे भाजप शिवसेनेला सासोली मतदारसंघ सोडायला तयार आहे, तर माटणेकडे भाजपचे झालेले दुर्लक्ष, यातून मतदारांची नाराजी आणि त्याचा फायदा उठवत शिवसेनेने विकासकामांच्या माध्यमातून मतदारांशी साधलेली जवळीक यामुळे शिवसेना सासोलीऐवजी माटणेसाठी आग्रही आहे, मात्र भाजपने ती जागा आपणच जिंकण्याचा मुद्दा उपस्थित करून ती सोडण्यास नकार दर्शविला आहे. त्या एका जागेसाठी युती तुटेल की का, अशी स्थिती आहे. त्यावर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय काढण्यात येत असला तरी भाजपची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Web Title: Shivsena friendly fight in Fonda, Matane