प्रत्येक कुटुंबाला मिळतेय दोन घागरी पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

सध्या गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाई निवारण्यासाठी तहसीलदार व पाणी पुरवठा खात्याने पुढाकार घ्यावयास हवा. तात्कालिक उपायांऐवजी कायमस्वरुपी प्रयत्न व्हायला हवेत. 
- सुनील देसाई, ग्रामपंचायत सदस्य 

खानापूर: अतिपावसाच्या पश्‍चिम भागातील वडगाव-जांबोटीमध्ये मार्चमध्येच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मलप्रभा नदीत पाणी उपलब्ध असले तरी ते पिण्यालायक नाही. ते पाणी गावात आणण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणी व कूपनलिकांनी गाठलेल्या तळामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गतवर्षी तहसीलदार व प्यास फाउंडेशनने पुढाकार घेऊन टॅंकरने पाणीपुरवठा केला होता. मात्र यंदाही सोय अद्याप झाली नसल्याने ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. 

वडगाव-जांबोटी भागातील विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. गावात 30 कूपनलिका असून केवळ तीनच कूपनलिकांना पाणी आहे. या कूपनलिकांना दिवसाकाठी 200 ते 250 घागरी पाणी मिळत आहे. गावातील एकूण 125 कुटुंबांना सध्या प्रत्येकी दोन घागरी पाणी रोज मिळत आहे. मलप्रभा नदीत पाणी आहे. पण, नदी गावापासून साडेतीन किलोमीटरवर आहे. तेथून पाणी खेचून गावात आणले जात आहे. मात्र, अंतर जास्त असल्याने विद्युत पंपावर भार पडून ती वारंवार खराब होत आहे. शिवाय जलवाहिनी फुटण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. 
गतवर्षीही गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती. मात्र, तहसीलदार शिवानंद उळेगड्डी व प्यास फौंडेशनने गावात रोज चार टॅंकर पाणी मिळण्याची व्यवस्था केली होती. आवश्‍यक ठिकाणी कूपनलिकाही खोदल्या. मात्र, त्या कूपनलिकांना पाणी लागले नाही. 

मलप्रभा नदीत सध्या गढूळ पाणी आहे. ते पिण्यालायक नाही. यामुळे गावातील लोकांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. याची कल्पना तहसीलदारांना दिली आहे. 

आज पाहणी 
तहसीलदार शिवानंद उळेगड्डी व पाणीपुरवठा खात्याचे अभियंता कोम्मण्णवर सोमवारी (ता. 20) वडगाव-जांबोटीला भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर गावात उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये यावर कायमस्वरुपी उपाययोजना होण्याची शक्‍यता आहे. 
 

Web Title: shortage of water in wadgaon