सिंधुदुर्गात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले

leopard
leopard

सावंतवाडी - जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. दरवर्षी सरासरी 50 च्या दरम्यान वन्यप्राणी हल्ल्याचे प्रकार घडतात; मात्र यंदा जूनपासूनच्या सहा महिन्यात तब्बल 41 वन्यप्राणी हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. जिल्ह्यात वन्यप्राणी मानव संघर्षाच्यादृष्टीने हा गंभीर प्रकार असून भविष्यात याचा पर्यावरणाच्या संतुलनावरही परिणाम होण्याची भीती आहे.

जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातील परीसरात वन्यंप्राण्याचे भरवस्तीतीत घुसून प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस प्रमाण वाढत असून सातार्डा, मळेवाड, पंचक्रोशी परिसरात गेल्या काही दिवसात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. नुकताच सातार्डा येथे पुन्हा एकदा कुत्रा व गाय बिबट्याच्या हल्ल्याची शिकार बनली आहे. वनविभागासमोर इतर वन्यप्राण्याच्या तुलनेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. यंदाच्या वर्षी सुमारे 41 वेळा वन्यप्राण्यांकडून हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत.

गेल्या काही महिन्यात तालुक्‍याच्या गोवा सीमावर्ती काही भागातील गावे बिबट्याच्या हल्ल्याने पुरती प्रभावित झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. त्यामुळे पाळीव पशुधनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात शेती व्यवसाय थोडासा मंदावलेल्या स्थितीत असतो. या कालावधीत पाळीव जनावरांना परिसरातील डोंगर व माळरान परिसरात चरण्यासाठी सोडण्यात येते. या वेळी बिबट्याला गायी, बैल, कुत्रे, म्हशी सारख्या जनावरांचा भक्ष प्राप्त होतो. यामुळे सर्वसामान्य शेतकरीवर्ग मात्र हवालदिल होताना दिसत आहे. वनविभागाकडे यासाठी पंचनामा करण्यासाठी व कागदपत्राच्या पूर्ततेसाठी खेपा घालाव्या लागतात. नुकसान भरपाई जरी मिळत असली तरी यात वेळ मात्र बराच खर्ची घालावा लागतो. गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहता वन्यप्राण्यांकडून दरवर्षी 50 पेक्षा जास्त हल्ल्याची प्रकरणे जिल्हाभरात घडून येतात. 2013-14 या आर्थिक वर्षात 53 वेळा हल्ले झाले आहेत. यात 3 लाख 65 हजार 825 एवढी रक्कम नुकसानग्रस्तांना देण्यात आली. तर 14 -15 या आर्थिक वर्षात तब्बल 88 पाळीव जनावरांचा बळी गेला यासाठी 6 लाख 32 हजार 750 निधीचे वाटप करण्यात आले. 15- 16 या आर्थिक वर्षात 83 प्राण्यांचा बळी गेला असून 5 लाख 59 हजार 451 रुपयांचा निधी वनविभागातर्फे वितरित करण्यात आला. यंदाच्या अद्याप चालू वर्षी सहामहिन्याच्या कालावधीत तब्बल 41 वेळा वन्यप्राण्यांकडून हल्ले झाले असून ही सर्वात मोठी आकडेवारी असल्याचे समजते. या वर्षी 3 लाख 54 हजार 501 एवढा निधी वनविभागाने दिला आहे. पुढील सहा महिन्यात यात वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. वनविभागाच्या माहितीनुसार यात बरेच हल्ले हे बिबट्यासारख्या प्राण्याकडून झालेले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग हा वनअधिवासक्षेत्राचा आहे. त्यात डोंगराच्या पायथ्याशी परिश्रम करून राबविणाऱ्या शेतकरीवर्गाला वन्यप्राण्यांकडून उपद्रवाचाही सामना करावा लागत आहे.

पाण्याच्या शोधात जाताहेत बळी
रब्बी हंगामात भातशेती किरकोळ प्रमाणात होत असली तरी सह्याद्री पट्ट्यात तरी भातपिकासोबत भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात घेतली जाते. डोंगराच्या पायथ्याशी नदीच्या काठावर किवा ओलीत जमिनीशेजारी या शेतीचे प्रमाण जास्त असते; मात्र या कालावधीत पाण्याचा शोध घेण्यासाठी वन्यप्राण्याचे शेतीत घुसण्याचे प्रकार वाढल्यामुळे त्याचा परिणाम शेतीच्या नासधूस होण्याबरोबरच सोबत पाळीव जनावरांचाही बळी जातो. यात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडण्याच्या बऱ्याच घटणा आहेत. यासाठी शेती परीसरात वनविभागाने लक्ष घालणे आवश्‍यक आहे.

संघर्ष गंभीर वळणावर
वन्यप्राण्यांकडून वस्तीत येऊन शिकार करण्याच्या वाढत्या संख्येमुळे मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. याचा भविष्यात पर्यावरण संतुलनावर परिणाम होऊ शकतो. वन्यप्राणी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढल्यास त्यांची सुरक्षितता धोक्‍यात येऊ शकते, शिवाय वस्तीलाही दहशतीखाली राहण्याची वेळ येते.

आकडेवारीवरून गेल्या काही वर्षात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात बरीच वाढ झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ग्रामीण भागात पाळीव जनावरांवर हल्लेही वाढत आहेत. यासाठी वनविभाग पूर्णपणेसज्ज असून बिबट्याच्या अधिवासातील प्रभावितक्षेत्रावर आमचे वनक्षेत्रपाल प्रभावी काम करत आहे. तक्रारी दाखल झाल्यावर त्या भागाची भेट घेऊन पाहणी करण्याचे कार्य वनविभागाकडून होत आहे.
- एस. रमेशकुमार, उपवनसंरक्षक वनविभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com