सिंधुदुर्ग किल्ला विकासास निधी कमी पडू देणार नाही 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

मालवण - सिंधुदुर्गच्या विकासासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही. किल्ल्याच्या विकासासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा, असे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना दिले. 

मालवण - सिंधुदुर्गच्या विकासासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही. किल्ल्याच्या विकासासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा, असे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना दिले. 

सिंधुदुर्ग किल्ला सर्वांचे स्फूर्तिस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेता यावी, यासाठीच आज किल्ल्याला भेट देऊन शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. किल्ला फार सुंदर असून यातून सर्वांनी स्फूर्ती घेणे आवश्‍यक आहे, असे मत विद्यासागर राव यांनी सिंधुदुर्ग किल्ला येथे व्यक्त केले. राज्यपालांनी सपत्नीक तारकर्ली ते सिंधुदुर्ग किल्ला, असा बोटीतून प्रवास केला. आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. पालकमंत्री दीपक केसरकर, इतिहास संशोधक डॉ. अमर अडके, जिल्हाधिकारी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, मुख्याधिकारी रंजना गगे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी राजेश दिवेकर, नगरसेवक पंकज सादये, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्‍वर मंदिरात किल्ला रहिवासी संघातर्फे सयाजी संकपाळ यांनी त्यांचे स्वागत केले. किल्ल्याच्या इतिहासाविषयी डॉ. अडके यांनी माहिती दिली. यावेळी किल्ल्याच्या विकासासंदर्भात राज्यपालांनी पालकमंत्री केसरकर व जिल्हाधिकारी चौधरी यांच्याशी चर्चा केली. 

किल्ला भेटीनंतर पालकमंत्री केसरकर यांच्या विनंतीनुसार राज्यपालांनी शतकमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या येथील पालिकेस भेट दिली. तेथे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्वागत केले.