पर्यावरणसाठी ‘त्यांची’ ११ देशात पायपीट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

सिंधुदुर्गात दाखल - उद्या करणार वृक्ष लागवड; ३७ वेर्षांपासून प्रबोधन

सिंधुदुर्गात दाखल - उद्या करणार वृक्ष लागवड; ३७ वेर्षांपासून प्रबोधन
सिंधुदुर्गनगरी - तब्बल ३७ वर्षांपूर्वी पर्यावरण संवर्धनाचे व्रत घेऊन घराबाहेर पडलेले तीन ध्येयवेडे आज सिंधुदुर्गात दाखल झाले. भारतासह ११ देशांत साडेतीन लाख किलोमीटरची पायपीट करीत या ध्येयवेड्यांनी साडेनऊ कोटी वृक्षांची लागवड केली आहे. सिंधुदुर्गामध्ये २८ ला जिल्हा परिषद आवारात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही शाळांना भेटी देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पर्यावरणाचे महत्व आणि त्याबाबतची माहिती विशद करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन, वनअधिकारी आणि काही नगरपरीषदांना भेटी देणार आहे. या मोहिमेत अवध बिहारी लाल, जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप अशी या ध्येवेड्यांची नावे आहेत.

या मोहिमेची सुरवात अवध बिहारी लाल यांनी १९८० मध्ये केली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरण संरक्षणाची देशाला हाक दिली. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत अवध बिहारी लाल पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सरसावले. तेव्हापासून त्यांनी वृक्ष लागवडीची मोहीमच हाती घेतली. पहिली पंधरा वर्षे ते एकटेच देशभर पायपीट करीत होते. १९९५ पासून त्यांच्या या मोहिमेत तरुण, तरुणी सहभागी होऊ लागले. काहींनी मध्यावरच मोहिम सोडली, तर काहीजण या मोहिमेचे अविभाज्य अंगच बनून गेले.

सध्या २० जणांचा चमू लाल यांच्यासोबतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भ्रमंती करीत आहे. त्यात चार मुलींचाही समावेश आहे. आतापर्यंत त्यांनी अकरा देशात साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. तसेच साडेनऊ कोटी वृक्षांची लागवडही केली आहे. लिम्का, गिनिज व इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे,  अशी अवध बिहारीलाल यांनी माहिती दिली आहे. आज ध्येयवेड्यांची जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली व भ्रमंतीबाबतची माहिती त्यांना विशद केली. देशात आणि राज्यात पर्यावरण आणि वृक्षारोपण या महत्वांच्या बाबींकडे लक्ष देणाऱ्या आणि जनासामान्यात जनजागृती करणाऱ्यांची जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वागत केले.