मुलींच्या जन्मप्रमाणात वाढ

नंदकुमार आयरे
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सिंधुदुर्गातील चित्र - जुलैमध्ये जन्मलेल्या 709 बालकांमध्ये 358 मुली

सिंधुदुर्गातील चित्र - जुलैमध्ये जन्मलेल्या 709 बालकांमध्ये 358 मुली
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील मुला-मुलींच्या जन्मप्रमाणात समतोल राखण्यात यश मिळविले आहे. जुलैमध्ये जन्मलेल्या एकूण 709 नवजात बालकांमध्ये मुलगे 351, तर मुली 358 जन्मल्याची नोंद आहे. जुलैमध्ये मुलांपेक्षा मुलींचे जन्मप्रमाण 7 ने वाढले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छता, शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील कामकाजात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. शासनाच्या प्रत्येक योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. स्वच्छ भारत अभियान, तंटामुक्ती अभियानासह जिल्ह्याची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया योजनाही यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न जिल्ह्यात होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे मुला-मुलींच्या जन्मप्रमाणात समतोल राखताना स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. मुलींचे घटणारे जन्मप्रमाण रोखण्यासाठीच्या उपाययोजना करताना मुलींच्या जन्माबाबतची जनजागृती आणि मुली जन्माचे स्वागत आदी उपाययोजनांवर भर दिला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा जिल्ह्यातील मुला-मुलींच्या जन्मप्रमाणात समतोल राखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. बालमृत्यू रोखणे, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे. मुली जन्माचे प्रमाण वाढावे, मुला-मुलींच्या जन्म प्रमाणातील विषमता दूर करण्यासाठी आणि मुलगाच पाहिजे, ही मानसिकता दूर करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून होत असलेल्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. जुलैमध्ये जन्मलेल्या एकूण बालकांमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य यंत्रणेचे मुली-मुलांच्या जन्मप्रमाणात समतोल राखण्यात एक पाऊल पुढे पडले आहे.

जुलैमध्ये चढता आलेख
जिल्ह्यात एप्रिल 2017 पासून ते जुलै 2017 या चार महिन्यांच्या कालावधीत एकूण दोन हजार 682 नवजात बालकांचा जन्म झाला. यात एक हजार 392 मुलगे, तर एक हजार 290 मुली जन्मल्या आहेत. यात 102 एवढ्या मुली कमी जन्मल्या असल्या, तरी जुलै 2017 मध्ये एकूण जन्मलेल्या 709 नवजात बालकांमध्ये 351 मुलगे, तर 358 मुली जन्मल्या आहेत. मुलांपेक्षा 7 मुली अधिक जन्मल्या आहेत.